रोहित नाईक, मुंबई मानसिक तणाव प्रचंड असूनही अनेकदा सुशिक्षित वर्गही मनसोपचारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेण्यास संकोचतो. याचसंदर्भात जनजागृती करण्यासाठी डोंबिवलीचे सचिन गावकर सायकलवरून ‘भारत परिक्रमा’ करणार आहेत. त्यांची मोहीम ७ जानेवारीला सुरू होणार असून, ते २५ राज्यांना भेट देणार आहेत. विशेष म्हणजे अस्थमाचा त्रास असूनही त्यांनी विशेष प्रशिक्षण घेत मोहीम यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे.ठाणे येथील इन्स्टिट्यूट आॅफ सायकोलॉजिकल हेल्थ (आयपीएच) या संस्थेसोबत १४ वर्षांपासून काम करणारे ३७वर्षीय सचिन कला क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी जे.जे. स्कूल आॅफ आर्टमधून शिल्पकलेची पदवी प्राप्त केली आहे. दोन वर्षांपूर्वी सायकलिंगला सुरुवात केल्यानंतर स्वत:ला अजमावण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम पुण्यातील लवासा सायकल शर्यतीत भाग घेतला होता. मात्र स्पर्धात्मक सायकलिंगपेक्षा ‘टुरिंग सायकलिंग’ची आवड असणाऱ्या सचिन यांचे पूर्वीपासूनच सायकल भ्रमंतीचे स्वप्न होते. यापूर्वी त्यांनी मिझोरामची मोहीम केली होती. दरम्यान, या मोहिमेसाठी सचिन यांना एका नामांकित आंतरराष्ट्रीय सायकल कंपनीने उच्च दर्जाची सायकल दिली आहे.एकूण २२३ दिवस चालणाऱ्या या मोहिमेत ते रोज ८-१० तास सलग सायकलिंग करतील. रोज किमान ८० कि़मी़ अंतर पार करण्याचे लक्ष्य त्यांनी निश्चित केले आहे. या मोहिमेअंतर्गत विविध राज्यांतील नागरिकांमध्ये मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करणार असून, उपलब्ध उपचारांवर चर्चाही करणार आहेत. शिवाय रात्रीच्या वेळी स्थानिक नागरिकांसोबतच राहणार असल्याने विविध राज्यांतील संस्कृती जवळून अनुभवण्याची संधी मिळणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
डोंबिवलीकर सचिनची सायकलवरून भारत परिक्रमा
By admin | Published: January 05, 2015 4:45 AM