ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. २२ - वडाळ्याची मेट्रो ठाण्यातील कासारवडवली येथून थेट कल्याण-भिवंडीपर्यंत नेण्याचा निर्णय जाहीर झाला आहे. मात्र त्यामध्ये डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरचा समावेश न करण्यात आल्याने या परिसरातील नागरिक नाराज झाले असून सरकारच्या या सापत्न वागणूकीविरोधात डोंबिवलीकरांनी आवाज उठवला आहे. या अन्यायाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने डिजीटल आंदोलन करण्याचा निर्णय घेत डोंबिवलीकरांना 'ट्विटर'वर मोर्चा काढण्याचे आवाहन केले आहे. 'ट्विटरवर चालणा-या सरकारसाठी ट्विटरवर मोर्चा' अशा आशयाची पोस्टर्स आज सकाळपासूनच सोशल मीडियावर झळकत असून दुपारी २ पर्यंत ठाणे-डोंबिवली-बदलापूर मेट्रो प्रकल्पाच्या मागणीचा ' #metrofordombivli' हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये चालवावा असे आवाहनही मनसे नेत्यांनी डोंबिवलीकरांना केले आहे.
एमएमआरडीएने तळोजापर्यंत येणारी मेट्रो तातडीने डोंबिवलीसह पुढे न्यावी आणि येथील प्रवाशांना न्याय द्यावा, अन्यथा आम्ही न्यायालयात धाव घेणार आहोत, अशी भूमिका मनसेचे प्रदेश सरचिटणीस राजू पाटील यांनी ‘लोकमत’कडे स्पष्ट केली होती. ' डोंबिवलीत मेट्रो आलीच पाहिजे या मागणीसाठी आता मनसेने डिजीटल आंदोलन छेडले असून (केवळ) सोशल मीडियावर सक्रीय असणा-या सरकारपर्यंत आवाज पोहोचवण्यासाठी' हे पाऊल उचलण्यात आल्याचे समजते.
'बदलापूर ते ठाणेदरम्यान रेल्वे प्रवासात रोज सरासरी सात प्रवाशांचा अपघात होतो. त्यातील बहुतांशी प्रवाशांचा मृत्यू होतो, ही बाब गंभीर आहे. या मार्गावरील प्रवाशांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात, यासाठी सरकार प्रयत्नशील का नाही?' असा सवाल मनसेचे प्रदेश सरचिटणीस राजू पाटील यांनी उपस्थित केला होता. तर ' आधी महापालिका निवडणुकांच्या वेळी ६ हजार ५०० कोटींचे पॅकेज, त्यानंतर माणकोली पुलाच्या भूमिपूजनाचा उपक्रम आणि आता मेट्रो प्रकरण या एकापाठोपाठच्या घटनांमधून सरकारने येथील नागरिकांवर अन्यायच केला आहे. तो मनसे सहन करणार नाही. त्यासाठी जनआंदोलन केले जाईल', अशी भूमिका उपाध्यक्ष राजेश कदम यांनी मांडली होती.
डोंबिवलीकरांनी दिला उदंड प्रतिसाद
मनसेच्या या आवाहनाला डोंबिवलीकरांनीही उदंड प्रतिसाद दिला असून ट्विटर व फेसबूक या सोशल नेटवर्किंग साईट्सवर #metrofordombivli हा हॅशटॅग वापरत पोस्ट्स अपडेट केल्या आहेत.