नवी मुंबई : पनवेल तालुक्यात अनेक खासगी शाळा असून या शाळा नवीन प्रवेशासाठी पालकांकडून अॅडमिशन फी आणि डेव्हलपमेंट फीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात डोनेशन घेत आहेत. यामध्ये पालकांचा खिशा खाली केला जात असून खासगी शाळांची मोठ्या प्रमाणात मनमानी सुरू आहे. प्रहार संघटनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी शिक्षण उपसंचालक बी.बी.चव्हाण यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली, तसेच पनवेल तालुक्यातील खासगी शाळा डोनेशनमुक्त करण्याची मागणी केली.महिन्याभरापूर्वी प्रहार संघटनेचे संघटक संतोष गवस यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुका गटशिक्षण अधिकारी नवनाथ साबळे यांना याप्रकरणी देणगी घेणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर जिल्ह्यातील शाळांना फक्त नोटीस बजावण्यात आल्या असून त्याबाबत ठोस पावले उचलली गेली नाहीत, अशी नाराजी गवस यांनी व्यक्त केली.शहरातील शैक्षणिक संस्थांकडून महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (देणगी प्रतिबंधक) कायदा १९८७ ची पायमल्ली केली जात असून पालकांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचेही प्रहार संघटनेने सांगितले. अशा प्रकारे कायद्याचे उल्लंघन करत पालकांची लूट करणाऱ्या शाळांचे संस्थाचालक व मुख्याध्यापकांवरही फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच ज्या पालकांकडून अॅडमिशन फी व डेव्हलपमेंट फीच्या नावाखाली देणगी स्वरूपात पैसे घेण्यात आले आहे त्यांचे पैसे परत करावे, अशी मागणी विद्यार्थी संघटनेने केली. (प्रतिनिधी)
‘पनवेलमधील खासगी शाळा डोनेशनमुक्त करा’
By admin | Published: June 11, 2016 2:52 AM