मुंबई - जिल्हापरिषद अध्यक्षपदाचा मोह शिवसेना नेते कृष्णा पाटील डोणगावकर आणि माजी अध्यक्षा ऍड. देवयानी डोणगावकर यांना चांगलाच महागात पडला आहे. सत्तार यांनी कुमक पुरवल्यानंतर डोणगावकर दांपत्यांला बळ मिळाले होते. मात्र पद तर गेलंच, शिवाय पक्षातूनही या दांपत्याची हकालपट्टी झाली आहे. त्यावर आता कृष्णा पाटील डोणगावकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी मंत्री अब्दुल सत्तार राजीनामा देणार अशी चर्चा एक दिवस माध्यमांमध्ये सुरू होती. दुसरीकडे डोणगावकर दांपत्य जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी ठाम होते. अखेरीस सत्तार यांचे मंत्रीपद सुरक्षीत राहले तर डोणगावकर यांच्या हातून अध्यक्षपदही गेलं आणि पक्षापासून दूर व्हावे लागले. मात्र भाजपला रोखण्यासाठीच आपण हे सगळं केल्याचे कृष्णा पाटील डोणगावकर यांचे म्हणणे आहे.
काँग्रेसच्या सदस्यांना फोडून भाजपला अध्यक्षपद मिळवायचे होते. तशी तयारी त्यांनी केली होती. यासंदर्भात आपण स्थानिक नेत्यांसह मुंबईतील नेत्यांशी संपर्क केला होता. परंतु, खातेवाटपाच्या गोंधळामुळे याकडे दुर्लक्ष झाले. अशा स्थितीत भाजपला रोखण्यासाठी आपण सत्तार यांच्या मदतीने भाजपचा गट फोडला. केवळ पक्षाचा अध्यक्ष व्हावा म्हणून आपण हे केल्याचे त्यांचे म्हणणे होते.
डोणगावकर यांच्या बंडामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत बरोबरी झाली होती. मात्र ईश्वरी चिठ्ठीमुळे डोणगावकरांच्या इरादा धुळीस मिळाला. मात्र पक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री यांचा आघाडीधर्म निभावण्याचा आदेश डावलून बंड केल्यामुळे डोणगावकर दांपत्यावर कारवाई होणार हे निश्चित होते. ईश्वरी चिठ्ठीमुळे अध्यक्षपद काँग्रेसला मिळाले असले तरी उपाध्यक्षपदासाठी इच्छूक असलेल्या शिवसेना नेत्याचा पराभव झाला. त्यामुळे डोणगावकर यांची हकालपट्टी झाली. त्याचवेळी या बंडाला कुमक पुरवणारे सत्तार नामानिराळे राहिले असून त्यांचे राज्यमंत्रीपद आबाधित आहे. मात्र यात डोणगावकर दांपत्याचा राजकीय बळी गेला आहे.