माळशिरस : ‘अडला नारायण धरी गाढवाचे पाय’ हे दादा कोंडके यांच्या या गाण्याप्रमाणे मजुरांअभावी शेतकरी सध्या शेतीकामांसाठी गाढवांची मदत घेत आहेत. एक-दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे पेरणी, खुरपणी, खत घालणे, पिकांची आंतरमशागत करणे आदी शेतीच्या कामांची मोठी धांदल उडाल्याचे दिसत आहे.
या काळात मजूर मिळणे मुश्कील होऊ लागल्याने शेतकरी अडला आहे. मात्र यांंत्रिकीकरणाबरोबरच प्राण्यांची मदत घेऊन शेतकरी आपले काम भागवताना दिसत आहेत. पावसाने उघडीप दिल्यामुळे सध्या शेतातील विविध कामांसाठी शेतकºयांची धावपळ सुरू आहे. वाफसा येताच गहू, मका, ज्वारी या पिकांची पेरणी करावी लागणार आहे. सध्या असलेल्या पिकांची आंतरमशागत लांबल्यामुळेही कामांची धांदल उडाल्याचे दिसत आहे. यासाठी मजुरांची चणचण भासू लागल्याचे सर्वत्र चित्र आहे.
अडचणीच्या काळात गाढवाची लाखमोलाची साथ- गेल्या काही वर्षांपासून दुष्काळाशी सामना करणाºया शेतकºयाला अतिवृष्टीचा सामना करावा लागला. याबरोबरच पिकांचा बेभरवसा, बाजारभाव, साखर कारखानदारांची ढासळलेली स्थिती, दुबार पेरणीचे संकट अशा अनेक समस्यांचा बोजा घेऊन शेतकरी सध्या शेती करीत आहेत. यातच मजुरांची कमतरता भासत असल्यामुळे पुन्हा नवे संकट शेतकºयांसमोर उभे ठाकले आहे. त्यामुळे शेतकरी शेतीपूरक व्यवसायांचा आधार घेत शेतीला अर्थकारणाची जोड देत आहेत. यामुळे सध्यातरी अडलेल्या शेतकºयाला गाढवाने लाखमोलाची साथ दिली आहे.
पूर्वी जड वस्तूंची वाहतूक करण्यासाठी गाढवांचा सर्रास वापर होत होता. मात्र यात आधुनिक यंत्रांचा वापर सुरू झाल्याने गाढवाकडून कामाचे स्वरूप वेगळे करून त्यातून उदरनिर्वाह करावा लागत आहे. पिकांमध्ये यंत्रांऐवजी गाढवांकडून खत टाकण्यासाठी शेतकºयांची पसंती आहे. त्यामुळे डाळिंब, ऊस यासह वेगवेगळ्या पिकांमध्ये खत टाकण्यासाठी गाढवांना मोठी मागणी आहे.- मºयाबा काळे, गाढव मालक
यावर्षी परतीचा पाऊस लांबल्यामुळे लागवड झालेल्या उसाच्या मशागती लांबल्या आहेत. त्यामुळे उसाच्या पिकावरही परिणाम झाला आहे. वाढ खुंटली आहे़ या पिकांना खत घालण्यासाठी सध्या मजुरांची उणीव भासत असल्यामुळे गाढवांच्या मदतीने बांधावरील खत थेट पिकापर्यंत पोहोचविणे सोपे जाते.- दीपक वाघमोडे,शेतकरी