पिंपरी : एखाद्याचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदान करण्यास धावून जाणाऱ्या रक्तदात्यांना स्वत:ला अथवा त्यांच्या नातेवाइकांना रक्ताची गरज भासल्यास रक्त उपलब्ध होत नाही. वेळोवेळी स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना ऐनवेळी धावपळ करावी लागते. रक्तदान शिबिरे होतात. मोठ्या प्रमाणावर रक्त संकलित होते, तरीही रक्ताचा तुटवडा का भासतो, असा प्रश्न रक्तदात्यांकडून उपस्थित होऊ लागला आहे. कोणताही मोबदला मिळण्याची अपेक्षा न बाळगता अनेक जण रक्तदान करतात. अपघातातील जखमी अथवा आजारी रुग्ण यांच्यावर शस्त्रक्रिया करतेवेळी रक्ताची तातडीने गरज भासते. अशा वेळी रक्तदात्यांकडे संपर्क साधताच, ते रक्तदान करण्यास तयार होतात. आपली कामे बाजूला ठेवून वेळात वेळ काढून ते रक्तदान करतात. रक्तदानाची आवड आणि सामाजिक भान असल्याने वेळोवेळी रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्तपेढ्यांना रक्त उपलब्ध करून दिले जाते. राष्ट्रपुरुषांची जयंती, पुण्यतिथी, नेत्यांचे वाढदिवस, सण-समारंभ या निमित्ताने ठिकठिकाणी रक्तदान शिबिरे घेतली जातात. या शिबिरात संकलित झालेले रक्त रक्तपेढ्यांना दिले जाते. रक्तदात्यांनी मोफत दिलेले रक्त रक्तपेढ्या अव्वाच्या सव्वा दराने रुग्णांना देतात. रक्तपेढ्यांमधून उपलब्ध होणाऱ्या रक्तासाठी विविध ठिकाणी वेगवेगळे दर आकारले जात आहेत. त्यामुळे रक्तदात्यांमध्ये आता रक्तदानाबद्दल अनास्था दिसून येत आहे. रक्तातील पर्यायी घटक कृत्रिमरीत्या तयार करता येतात. परंतु, रक्त तयार करता येत नाही. त्यामुळे रक्तदानाला पर्याय नाही. रक्तपेढ्यांमधील रक्तसाठा रक्तदात्यांवर अवलंबून असतो. शहरातील विविध रक्तपेढ्यांतून रक्तदात्यांच्या संख्येत वाढ होत असली, तरी रक्ताची आवश्यकताही अधिक भासते आहे. त्यामुळे त्या प्रमाणात रक्त उपलब्ध होणे अपेक्षित आहे, असे विविध रुग्णालयांतील डॉक्टरांचे मत आहे. रोगाचे निदान करण्याच्या सुविधा उपलब्ध झाल्या, तरी आजार बळावणे थांबत नाही. आॅपरेशनसाठी रक्ताची जास्त गरज असते. अलीकडच्या काळात अवयव प्रत्यारोपणाला महत्त्व आले आहे. मूत्रपिंड किंवा यकृताच्या प्रत्यारोपणासाठी एकाच गटाच्या पाच ते दहा पिशव्यांची गरज असते. त्याशिवाय डेंगीसारख्या आजारात प्लेटलेट्सची संख्या घटते. अशा वेळी रक्ताची गरज भासते. रुग्णांच्या नातेवाइकांना धावाधाव करावी लागते.(प्रतिनिधी)
रक्तदात्यांनाही मोजावी लागते किंमत
By admin | Published: April 29, 2016 1:53 AM