ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ - दुष्काळग्रस्तांसाठी जमा करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सहायता निधीतील पैसे बँकॉकमधील नृत्यस्पर्धेसाठी दिल्यामुळे झालेल्या गदारोळानंतर नृत्यस्पर्धेतील कलाकारांनी ते पैसे मुख्यमंत्री निधीला परत केले आहेत. नृत्यस्पर्धेसाठी देण्यात आलेला ८ लाख रुपये डान्स ग्रुपने परत केले आहेत.
राज्यातील जनता भीषण दुष्काळाचा सामना करत असतानाच शासकीय अधिका-यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील ८ लाख रुपये शासकीय कलाकारांना दिल्याचा धक्कादायक प्रकार माहिती अधिकारी कार्यकर्ते अनिल गलगली यांनी गेल्या आठवड्यात उघड केला होता. २५ ऑगस्ट २०१५ रोजी बँकॉक-थायलंडमध्ये होणाऱ्या नृत्य स्पर्धेसाठी शासकीय कलाकारांना खास बाब म्हणून चक्क 8 लाखांचा निधी मंजूर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे समोर आले होते. मुख्यमंत्री सहायता निधीचा गैरवापर करणे चुकीचा असल्याचे सांगत कलाकारांना दिलेले हे ८ लाख रुपये परत घ्यावेत अशी मागणी गलगली यांनी केली होती.
मात्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील सर्व पैसे दुष्काळग्रस्तांसाठी वापरण्यात येत नाहीत, त्यातील काही रक्कम सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी राखून ठेवलेली असते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. मात्र त्यानंतरही या कृतीबाबत सर्व स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. दुष्काळग्रस्तांसाठी शाळकरी पोरांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी जमेल तशी मदत मुख्यमंत्री निधीत जमा केली होती. मात्र या रकमेचा दुरूपयोग करून ती चक्क नृत्य स्पर्धेसाठी दिल्याने सर्व स्तरातून टीकेची झोड उठत आहे.
अखेर आज त्या नृत्यस्पर्धेत सहभागी झालेल्या कलाकारांनी ही ८ लाख रुपयांची रक्कम परत केली आहे.