मुंबई : विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या सरकारकडून शेतकऱ्यांची 2 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी करण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, ही कर्जमाफी फसवी असल्याचे आरोप होऊ लागल्यावर महाराष्ट्र विकास आघाडीचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी मोठा खुलासा केला आहे.
ठाकरे सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या शासन निर्णयात केलेल्या उल्लेखानुसार, राज्यातील ज्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्याची मुद्दल व व्याजासह दिनांक 30 सप्टेंबर 2019 पर्यंत थकबाकीची रक्कम 2 लाखांपेक्षा जास्त असेल अशी कर्जखाती कर्जमुक्तीच्या लाभास पात्र ठरणार नाही, असा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून विरोधी पक्षांसह सहकारी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनीही टीका केली होती. तसेच 2 लाखांची अट काढून टाकावी अशी मागणी त्यांनी केली होती.
यावर आज जयंत पाटलांचा खुलासा आला आहे. दोन लाखांपेक्षा जास्त पीककर्ज घेतलेले असेल त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही. २ लाखांचा आकडा मोठा आहे, त्यामुळे कोणतीही घिसाडगाई करून आम्हाला निर्णय घ्यायचा नाही. तुमचीही कर्जमाफी होईल, योग्य वेळ आली की निर्णय घेतला जाईल, असे पाटील यांनी सांगितले.
तसेच ज्यांनी पत्नीला दाखविल्याशिवाय कर्जमाफी मिळणार नसल्याची अट घातली होती ते टीका करणारच. भाजपाने शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी जाचक अटी घातल्या आणि रांगेत उभे केले. आम्ही असे काही शेतकऱ्याला करायला भाग पाडणार नाही. सोप्या पद्धतीने आमची कर्जमाफी असेल, असे प्रत्युत्तरही पाटील यांनी भाजपाच्या नेत्यांना दिले.