श्रीकांत शिंदे यांना कल्याण लोकसभेची उमेदवारी देण्यावरून भाजपात विरोधाचे वातावरण आहे. यामुळेच अद्याप शिंदे यांची उमेदवारी शिवसेनेने जाहीर केली नव्हती. हा विरोध हाणून पाडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुद्द देवेंद्र फडणवीसांच्याच तोंडून मुलाची उमेदवारी जाहीर करायला लावली आहे. तरीही भाजपाचा विरोध शमेल असे दिसत नाहीय. यातच आता शिंदेंच्या जिल्हाप्रमुखाने भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपाचे पदाधिकारी, मंत्री, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी हिरारीने भाग घेत आहेत. ज्या आमदाराने गोळीबार केला त्या आमदारांचे समर्थकांनी भाजप कार्यकर्ता असल्याचे भासवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते भाजपचे नाहीत. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि आरपीआय यांना एकत्र घेऊन श्रीकांत शिंदे काम करतात. त्यामुळे ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा दावा शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांनी केला आहे.
गणपत गायकवाड यांनी जे कृत्य केले ते निश्चितच चुकीचे आहे आणि जर त्यांचे समर्थक असा काही कांगावा करत असतील आणि युतीमध्ये घोळ घालण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यामुळे गणपत गायकवाड यांना जामीन होईल, अशा भ्रमात त्यांनी राहू नये, असा इशाराही लांडगे यांनी दिला आहे. श्रीकांत शिंदे यांच्या बाबतीत अपप्रचार करू नये, त्यामुळे युतीचे वातावरण बिघडू शकते. युतीचे वातावरण बिघडू नये यासाठी भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी निश्चितपणे लक्ष घालावे आणि त्या दृष्टीने असे जे काही लोक युतीचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात, त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी देखील त्यांनी केली.
गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत भाजप कार्यकर्त्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा, अन्यथा काम करणार नाही, असा इशारा दिला होता. या बैठकीला शिवसेना शिंदे गटाने प्रतिक्रिया दिली आहे.