भाजपाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिल्लीवरून विमानाने रेमडेसिविर आणल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांनी रान पेटले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठात या इंजेक्शन खरेदीवर आक्षेप घेत याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. गृह विभागाच्या प्रधान सचिवांना शिर्डी विमानतळावर १० एप्रिल ते २५ एप्रिलपर्यंत आलेल्या सर्व खासगी विमानांचे सीसीटीव्ही फुटेज आणि रेकॉर्ड जतन करण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे सुजय विखे पाटील यांना हायकोर्टाने फटकारत तुम्ही रॉबिनहूड बनू नका असे म्हटले आहे.
न्या. रवींद्र घुगे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी पार पडली. तेव्हा सुजय विखेंना चुकीचा मार्ग निवडला असून रेमडेसिविर इंजेक्शनचा उपयोग आणि वापर सर्वांसमोर केला पाहिजे, अशा प्रकारे नाही. कोर्टाने सुजय विखेंनी कशा प्रकारे बेकायदा रीतीने रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी केली याची चौकशी केली गेली पाहिजे.संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे असं म्हणत कोर्टाने खडसावले आहे.
भाजपचे खासदार डॉ. सुजय विखेयांनी दिल्लीवरून विमानाने आणलेल्या रेमडेसीवीर इंजेक्शन प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे हा तपास सोपविला आहे. डॉ.सुजय विखे यांनी खरेदी केलेल्या रेमडेसिविर प्रकरणाचा तपास श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशावरून शिर्डी विमानतळावरील खासगी विमानांचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यासाठी शुक्रवारी मिटके हे विमानतळावर दाखल झाले होते. या प्रकरणाच्या तपासाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी उपअधीक्षक मिटके यांच्याकडे प्रकरणाचा तपास सोपविला. जिल्ह्यात गाजलेल्या राहुरी येथील पत्रकार दातीर खून प्रकरणाचा मिटके यांनी नुकताच छडा लावला होता. आता राज्यभर चचर्चेत आलेल्या खासदार डॉ.सुजय विखे यांच्या रेमडेसिविर खरेदी प्रकरणाचा तपासही मिटके यांच्याकडे देण्यात आला आहे.
विखे काय म्हणालेले...
विखे यांनी विशेष विमानाने इंजेक्शनचा साठा शिर्डीत उतरविला व तो वाटपही केला. यातील प्रत्येकी शंभर इंजेक्शन त्यांनी शिर्डीचे साईबाबा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयाला मोफत दिली. विखे म्हणाले की, ‘आपल्या मैत्रीचा वापर करत आपण थेट विमानाने इंजेक्शन आणली. त्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांचीही मदत घेतली. हे करत असताना गरिबांसाठी माझ्यावर कारवाई झाली तरी चालेल. त्यामुळेच मुद्दामहून इंजेक्शनचे वाटप झाल्यानंतर व्हिडिओ जाहीर करत आहे.’ विखे यांनी गत सोमवारी विमानाने हा साठा आणला. शिर्डी विमानतळावर त्यांनी हा साठा उतरविला. तो कोठून आणला व किती इंजेक्शन आणली हे त्यांनी जाहीर केलेले नाही.