कठोर निर्णय घेण्याची वेळ शासनावर आणू नका - अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 02:18 PM2021-02-22T14:18:30+5:302021-02-22T14:38:18+5:30
Ajit Pawar : पनवेल येथील न्हावा शेवा टप्पा 3 पाणी पुरवठा योजनेच्या उद्धाटन प्रसंगी अजित पवार बोलत होते.
मुंबई : राज्यात कोरोनासंदर्भात कठोर निर्णय घेण्याची वेळ शासनावर आणू नका, याकरिता नियमांचे पालन करा, असे अवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला केले आहे.
पनवेल येथील न्हावा शेवा टप्पा 3 पाणी पुरवठा योजनेच्या उद्धाटन प्रसंगी अजित पवार बोलत होते. लॉकडाऊनमुळे संपूर्ण अर्थव्यवस्था डबघाईला जाते. रोजंदारीवरील कामगारांना चूल पेटवता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे अजित पवार म्हणाले.
याचबरोबर, भविष्यात पाण्यासाठी युद्ध होणार आहेत. अनेक राज्यात पाण्याचे वाद झाले आहेत. हे वाद जिल्हा, तालुका, गावात पोहोचले आहे. पाण्याचा थेंब साठविणे गरजेचे आहे. पाणी जीवन आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. लोकांना पाण्याचे महत्व पटवून दिले पाहिजे. लोकांना जल साक्षर करण्याची आता वेळ आली आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करा, लॉकडाऊनची वेळ येणार नाही, याची खबरदारी घ्या, असेही अजित पवार म्हणाले.
"जग कितीही पुढे गेले तरी पाणी बनवता येत नाही, हे सत्य आहे"
जग कितीही पुढे गेले तरी पाणी बनवता येत नाही, हे सत्य आहे. विकास, उद्योग हवा आहे. मात्र जीव घेणा विकास नको. संकटाना आपणच आमंत्रण देत आहोत, असे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. याचबरोबर, कोरोनाच्या संकट आल्यावर लॉकडाऊनच्या काळात प्रदूषणाची पातळी खालावली होती. ही चांगली बाब आहे. मात्र, पुन्हा एकदा प्रदूषण वाढत चालले आहे. स्वातंत्र्य 75 वर्षांनंतरही पिण्याचे पाणी आपण देऊ शकत नसल्यास खूप वाईट आहे. मंगळावर पाणी शोधण्यपेक्षा जमिनीवर प्रदूषण शोधा, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.