पुणे – राज्यात भाजपा नेते अनेकदा काही दिवस थांबा, महाविकास आघाडी सरकार स्वत: कोसळेल. राज्यात पुन्हा भाजपाचं सरकार लवकरच येईल असा दावा करत आले आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीचे नेतेही आमचं सरकार ५ वर्ष चालेल. कुणीही हे सरकार पाडू शकत नाही असं प्रतिदावा करत आहे. त्यातच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा सूचक दावा केला आहे.
देहू येथील एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी जाहीर कार्यक्रमात जे विधान केले त्यावरुन तर्क-वितर्क लढवले जात आहेत. यात एकाने माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख केला. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत कळेल असं विधान केल्याने नेमकं चंद्रकांतदादांना काय सूचित करायचं आहे हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. या तिन्ही पक्षात अंतर्गत वाद असला तरी उघडपणे कुणीही भाष्य करत नाही. त्यात चंद्रकांत पाटलांनी २-३ दिवसांत कळेल हे विधान केल्याने नेमकं काय घडेल हे पाहणं उत्सुकतेचे आहे.
काही महिन्यांपूर्वी भाजपा स्बळावर निवडणूक लढवण्याची घोषणा करत आहे. त्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी राजकीय गणितंही मांडली होती. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने राज्यात स्वबळावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजपाला १२२ जागा जिंकण्यात यश मिळाले होते. तर २०१९ मध्ये शिवसेना आणि भाजपा यांनी युती करून निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजपाला १०५ जागा जिंकता आल्या होत्या. त्यानंतर पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपाचा विजय झाला. महाराष्ट्रामध्ये सध्या भाजपाचे १०६ आमदार असूनही आपली मते आहेत १ कोटी ४२ लाख. १ कोटी ७० लाख मतं ज्याला मिळतात त्याला स्वबळावर सरकार स्थापन करता येते. एकट्याच्या ताकदीवर १४० जागा जिंकायच्या असतील १ कोटी ७० लाख मतं आवश्यक आहेत. आपण काय म्हणतोय की २५ डिसेंबरपर्यंत दोन कोटी लोकांना भाजपाचं सदस्य करायचं. मग १४० येतील की जास्त येतील. १ कोटी ७० लाखाला १४० जागा येतात. ३० लाख अधिक झाले. महाराष्ट्रामध्ये एकट्याने सरकार आणायचे असेल तर हे अभियान यशस्वी करावे लागेल असं त्यांनी म्हटलं होतं.
संभाजी ब्रिगेडसोबत युतीचं ऑफर काय ते पाहू
'पुरुषोत्तम खेडेकर यांनी मुखपत्रातून भाजपासोबत युतीची इच्छा व्यक्त केली आहे. भाजपकडून अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. खेडेकरांची ऑफर काय आहे, हे आधी बघू आणि नंतर ठरवू. भाजपा एका व्यक्तीचा पक्ष नाही. खेडेकरांकडून प्रस्ताव आला नाही आल्यावर कोअर कमिटीत बसून निर्णय घेऊ अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.