मुंबई : सध्या सर्वत्र १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर झाला आहे. त्यामुळे अनेकांना घरी बसावे लागले आहे. अशातच एप्रिल महिना सुरू होत असल्याने अनेक शाळांची शैक्षणिक वर्षही संपली आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक शाळांकडून विशेषतः बड्या ,, आणि केंद्रीय मंडळाच्या शाळांकडून पालकांकडे मुलांची फी भरण्यासाठी तगादा लावला जात आहे. लॉकडाऊन आधीच अनेकांचे आर्थिक गणित बिघडले असल्याने शुल्क भरण्यासाठी मुदत मिळावी, अशी अपेक्षा अनेक पालकांकडून व्यक्त केली जात होती . या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीमध्ये पालकांना सक्ती करण्यात येऊ नये असे परिपत्रक शिक्षण विभागाकडून काढण्यात आले आहे.
संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू असल्याने अनेक पालकांचे रोजगाराचे साधन बंद झाले आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती कोलमडली आहे. अशा परिस्थितीत शाळांनी पालकांकडे शाळेची फी भरण्यासाठी तगादा लावणे योग्य नाही, अशी सूचना शिक्षण विभागाने आहे. केंद्रीय मंडळाच्या शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरु होण्याची वेळ झाली असल्याने शहरातील शाळांतून पालकांना ईमेल व मेसेजेसच्या माध्यमातून पुढील शैक्षणिक वर्षाची फी भरण्यासाठी संदेश धाडण्यात आले आहेत. मात्र यामुळे पालकांपुढे अडचण निर्माण झाली असल्याच्या तक्रारी शिक्षणाधिकारी कार्यालयांना प्राप्त होत आहेत.
या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मंडळाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना चालू वर्षाची व आगामी शैक्षणिक वर्षाची फी गोळा करताना सहानुभूती दाखविणे आवश्यक असल्याचे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार लॉकडाऊन संपल्यानंतर फी गोळा करण्याची कार्यवाही शाळांनी करावी , आत्ता पालकांना सक्ती करण्यात येऊ नये अशा सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.
अत्यंत चांगला निर्णय आहे सरकारने. आज देशातच नव्हे तर सार्या जगात कोरोना वायरसच्या दहशतीतून मानवतावादी निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिक परिस्थिती ढेपाळली असतानाच मुलांच्या पालकांना आपल्या मुलांच्याही शिक्षणाची काळजी लागली असताना सरकारने घेतलेला हा निर्णय नक्कीच दिलासादायक आहे.
उदय नरे, शिक्षक, हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल