लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : ईडीच्या अटकसत्राला घाबरून आमच्याकडे येण्याचे पुण्य करू नका. कारवाईची भीती वाटत असेल म्हणून आमच्यासोबत यावे, यासाठी आमचा कुणावरही दबाव नाही, असे स्पष्टीकरण देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. तर माजी मंत्री अर्जुन खोतकर यांना टोमणा मारला. हे सरकार टिकेल, कार्यकाळही पूर्ण करील आणि पुन्हा निवडूनही येईल, असा दावा करीत मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असे सांगत शनिवारी रात्री दिल्लीतील घडामोडींवर भाष्य करणे टाळले. विभागीय आयुक्तालयात रविवारी मराठवाडा नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, खासदार संजय राऊत यांचे काय होईल, मला माहिती नाही. ते म्हणालेच आहेत ना, कर नाही त्याला डर कशाला? त्यामुळे चौकशी होऊन जाऊ द्या. महाविकास आघाडीचे ते मोठे नेते होते. ईडीला घाबरून भाजपकडे जाणार नाही, असे ते म्हणत आहेत. त्यांना कुणीही बोलावलेले नाही. ईडीच्या कारवाईने कुणी येत असेल तर आमच्याकडे म्हणजेच शिवसेना-भाजपाकडे येऊ नका. अर्जुन खोतकर किंवा अन्य कुणी असो, ईडीला घाबरून येऊ नका, हे पुण्याचे काम करू नका. केंद्रीय तपास यंत्रणेने यापूर्वीही तपास केलेले आहेत.
चुकीचा तपास केला असता तर न्यायालयाने संबंधितांना दिलासा दिला असता. आमच्याकडे आलेल्या आमदार, खासदारांपैकी एकाने तरी ईडीच्या कारवाईमुळे आल्याचे सांगितले का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
आज जे बोललो ते होईल...आज जे मी बोललो आहे, त्याची पूर्ण अंमलबजावणी करण्याचे काम सरकारचे आहे. मागे काय झाले, हे माहीत नाही. जे होणार आहे, तेच बोललो आहे. मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक निश्चितपणे व्हावी, याचा विचार मी करीन, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी शपथविधीनंतर आजवर घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.