महाविकास आघाडीमध्ये सध्या लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविण्याची चर्चा सुरु झाली आहे. तिन्ही पक्षांनी अर्थात ठाकरे गट, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेस यांनी आपापल्या ताकदीची चाचपणी सुरु केली आहे. सत्ताधारी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला रोखण्यासाठी आता मविआडीने तयारी सुरू केल्याचे दिसते. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या वृत्ताला दुजारा देत आमचे १९ खासदार लोकसभेत राहतील, असे म्हटले आहे. यावर बोलताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आघाडीत अडचण निर्माण न करण्याचा सल्ला दिला आहे.
जागा लढण्यापेक्षा जागा कशा जिंकल्या जातील याची चर्चा व्हावी ही कॉंग्रेसची भूमिका आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे वक्तव्य करून महाविकास आघाडीच्या पुढच्या रणनीतीमध्ये अडचण निर्माण करू नये असा आमचा त्यांना सल्ला आहे, असे नाना पटोले यांनी राऊतांच्या विधानावर म्हटले. तसेच अद्याप असा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही, अशी चर्चा देखील झालेली नाही. आमच्या तिन्ही पक्षांकडून ३-३ लोक देऊन ९ लोकांची समिती केली जाईल आणि अंतिम निर्णय घेतला जाईल, असे पटोले यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, प्रत्येक पक्षाने आपापली तयारी सुरू केली असेल तर यात काहीही वावगे नाही, असे पटोले यांनी शरद पवार यांच्या प्रश्नावर म्हटले. कॉंग्रेस देखील आपले काम करत असून आमची चाचपणी सुरू असल्याचे पटोले यांनी अधिक सांगितले.
"ठाकरे गट लोकसभेच्या १९ जागा जिंकणार"पवारांच्या घरी जी बैठक झाली ती एकत्र लढविण्याच्या चर्चेसाठी होती. कोणी काही म्हणूदेत आघाडी एकत्रच लढणार आहे. आमचे १९ खासदार लोकसभेत राहतील, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. मागीलवेळी लोकसभेला राष्ट्रवादीने चार जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसने जरी एक जागा जिंकली असेल तरी ती त्यांच्याकडेच राहिल. यामुळे जिंकल्यानंतर कोण कुठे गेला यावर जागावाटप ठरणार नाही. दादरा नगर हवेलीचा एक खासदार आमचा आहे, महाराष्ट्रात १८ जागा जिंकल्या होत्या. मी एवढेच सांगेन की लोकसभेत आमचे १९ खासदार असतील, असे राऊत यांनी स्पष्ट केले.