रडायचं नाही लढायचं! ईडी कोठडीतून संजय राऊतांचं विरोधी पक्षातील नेत्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 04:55 PM2022-08-05T16:55:32+5:302022-08-05T17:42:05+5:30
पत्रा चाळ पुनर्विकास प्रकरणी १ हजार ३४ कोटी रुपयांच्या झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच अडचणीत आले.
मुंबई - पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षाला एक पत्र लिहिलं पाहिजे. अडचणीच्या काळात संसदेत आणि बाहेर माझ्या समर्थनार्थ आवाज उचलला. आता रडायचं नाही तर लढायचं अशा शब्दात राऊतांनी बाळासाहेबांच्या आठवणींनाही उजाळा दिला आहे.
राऊतांनी पत्र लिहिलंय की, अडचणीच्या काळात तुमच्यासोबत कोण आहे हे कळतं. केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावापुढे मी झुकणार नाही. अंतिम श्वासापर्यंत मी लढत राहीन. कुठल्याही प्रकारच्या दबावापुढे मी शरण जाणार नाही. योग्य वेळ आल्यावर आमचाच विजय होणार आहे. आमच्या विचारांचा विजय होईल आणि देश योग्य दिशेने पुढे जाईल असंही त्यांनी सांगितले आहे.
त्याचसोबत आता ध्येर्याने काम करावं लागेल. संयम ठेवावा लागेल. परंतु वेळ आल्यानंतर बाजी आमचीच असेल. पत्राद्वारे राऊतांनी काँग्रेस, सीपीएम आणि अन्य विरोधी पक्षांचे धन्यवाद मानले आहेत. न्यायासाठी माझी लढाई सुरूच राहील. वंदनीय हिंदुह्द्रयसम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे रडायचं नाही लढायचं. या लढाईत मला साथ दिल्याबद्दल मी आभारी आहे असं पत्र राऊतांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना पाठवलं आहे.
८ ऑगस्टपर्यंत राऊतांचा मुक्काम तुरुंगातच
पत्रा चाळ पुनर्विकास प्रकरणी १ हजार ३४ कोटी रुपयांच्या झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच अडचणीत आले. अनेक तासांच्या चौकशीनंतर अखेर ईडीने संजय राऊत यांना अटक केली. त्यानंतर, न्यायलयाने राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. संजय राऊत यांना पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांच्या कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. आता, राऊतांचा कोठडीतील मुक्काम आणखी ४ दिवस वाढला आहे. तत्पूर्वी राऊत यांनी ईडी कोठडीवर काही आरोप केले आहेत.
प्रियंका गांधींची टीका
"धमकी, छळ, कपट यातून सत्ता ताब्यात घेणं आणि लोकशाही चिरडणं हेच भाजपाचं एकमेव लक्ष्य" असं म्हणत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "धमकी, छळ, कपट यातून सत्ता ताब्यात घेणं आणि लोकशाही चिरडणं हेच भाजपाचं एकमेव लक्ष्य आहे. संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबावर हल्ला करण्यात आला, कारण ते भाजपाच्या छळ-कपटाच्या राजकारणाला घाबरले नाहीत आणि त्यांचा सामना त्यांनी केला. भीती आणि धमकी भित्र्यांची हत्यारं आहेत, सत्याच्या वारासमोर हे टिकणार नाहीत" असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं.