लोकसभा निवडणूक सर्व्हेवर निष्कर्ष काढू नये, कारण...; शरद पवारांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 03:49 PM2023-12-25T15:49:36+5:302023-12-25T15:50:14+5:30
सर्व्हेवर अवलंबून राहून कुणी निष्कर्ष काढू नये असं शरद पवारांनी स्पष्ट सांगितले.
पुणे - जर आज राज्यात लोकसभा निवडणूक झाली तर महायुतीला जोरदार फटका बसेल आणि महाविकास आघाडीला यश मिळेल असा अंदाज सी व्होटरच्या सर्व्हेमधून दिसून आला. या सर्व्हेवर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांची प्रतिक्रिया त्यात शरद पवारांनी सर्व्हेवर भरवसा ठेऊ नका असं थेट स्पष्ट शब्दात सांगितले. पुण्यातील भीमथडीचे प्रदर्शन पाहण्यासाठी आले होते.त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला
शरद पवार म्हणाले की, सर्व्हेवर अवलंबून राहून कुणी निष्कर्ष काढू नये. सर्व्हे नेहमी येत असतात. त्यात ते अनेकवेळा खरे खोटे असतात. आताच पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्याचे सर्व्हे वेगळे आकडे सांगत होते. पण प्रत्यक्षात लोकांनी अंतिम निकाल वेगळा दिला अशा शब्दात पवारांनी लोकसभा निवडणुकीबाबत आलेल्या सर्व्हेवर प्रतिक्रिया दिली आहे.
काय होता सर्व्हे?
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण ४८ जागा आहेत. इथं काँग्रेस-उबाठा-राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचा पगडा भारी असल्याचं दिसून येते. जर महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणुका झाल्या तर सर्व्हेनुसार, इथं महायुतीला १९-२१ जागा तर महाविकास आघाडीला २६-२८ जागा आणि इतरांना ०-२ जागा मिळतील असा अंदाज आहे. तर मतांच्या टक्केवारीत महायुतीला ३७ टक्के, काँग्रेसला ४१ टक्के आणि अन्य २२ टक्के मते मिळतील असं बोलले जात आहे.
अजित पवारांना टोला
मी नव्या लोकांना प्रोत्साहन देण्याची नेहमी कळाजी घेतली. मात्र, हे खरं आहे की गेल्या १० ते १५ वर्ष मी बारामतीत लक्ष घातलं नाही. मी कधीच कुठला निर्णय घेतला नाही. निर्णय घेतल्यानंतर त्याची कुठलीच तक्रार नसायची. आमच्या काळात बंड नव्हत आम्ही बसून निर्णय घ्यायचो असं प्रत्युत्तर शरद पवार यांनी अजित पवारांना दिले आहे. शरद पवार म्हणाले की, आमचं बंड नव्हतं. आम्ही बसून निर्णय घेतला होता. यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा लक्षात घेऊन आम्ही निर्णय घेतला. सर्वांनी बसून निर्णय घतेला होता. त्याबद्दल कुणी तक्रार करण्याची गरज नाही. आज कोणी काही केलं असेल तर त्याबद्दलही तक्रार करण्याची गरज नाही. फक्त पक्षाची निर्मिती कशी झाली? पक्षाचा संस्थापक कोण आहे? हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करण्याची गरज नाही असं पवारांनी म्हटलं.