भाजपाच्या सर्व्हेवरून शिंदे गटाने खासदार भावना गवळी यांच्यासह काही विद्यमान खासदारांचे तिकीट कापले आहे. यामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये गेल्या काही दिवसांपासून असंतोष असल्याचे चित्र आहे. अशातच ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी गवळींचे तिकीट कापल्यावर भाष्य केले आहे.
भावना गवळी यांनी गद्दारी केली. म्हणून त्यांची उमेदवारी आता कापली गेली आहे. आता भावना गवळी रडत बसल्या असतील. मी भावना गवळी यांना सांगितलं होतं की कुठेही जाऊ नका, परंतु त्या गेल्या, अशा शब्दांत खैरे यांनी गवळींच्या तिकीट कापल्यावर टीका केली आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावतीने जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात वातावरण निर्मिती झाली आहे. निवडणुकांमध्ये मागे पुढे चालूच राहते. आपला विरोधक खूप स्ट्रॉंग आहे आणि त्याला आपल्याला त्याला पाडायचे आहे. महायुतीचा गोंधळ संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे. कोणताही उमेदवार आमच्या समोर उभा असला की आम्ही त्याला कमी समजत नाही. मात्र आपण आपली तयारी जोरदार पद्धतीने करावी लागेल. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ज्यांनी गद्दारी केली त्यांना कोणीही स्थान देत नाही. माझ्या विरोधात कोणीही उभा असला तरी ही लढाई एकनिष्ठ विरुद्ध गद्दार अशी होणार आहे, अशी टीका खैरे यांनी केली.