पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत कांदा प्रश्नी घोषणाबाजी करणाऱ्या किरण सानपला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कांद्याचा प्रश्न तीन-चार जिल्ह्यात फार महत्त्वाचा आहे. त्याने तो प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. त्याला उत्तर मिळाले जय श्रीराम. त्यामुळे महाराष्ट्राला कळाले की शेतकऱ्यांकडे बघण्याची यांची प्रवृत्ती काय आहे, अशी टीका पाटील यांनी केली.
मुख्यमंत्र्यांच्या बॅग तपासणीवर ते नाटक केले गेल्याची टीका पाटलांनी केली. ज्यावेळी बॅगांमध्ये वजन होते त्यावेळेस तपासल्या नाहीत आता टीका झाल्यावर हलक्या बॅग तपासण्याचे नाटक केले गेले असे पाटील म्हणाले. घाचकोपरच्या होर्डिंचा मूळ प्रश्न म्हणजे ते होर्डिंग बेकायदेशीर होते. ठाकरेंच्या हातात महापालिका नाही. त्याला परवानगी देण्यापासून आतापर्यंत ते होर्डिंग तिथे का राहिलं? उद्धव ठाकरे यांच्यावर बोलून मूळ प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न नेहमी केला जातो, असा आरोप पाटील यांनी केला.
4 जूनला जेव्हा निकाल येईल त्यावेळी निकाल बघून काय निर्णय घ्यायचा यासाठी भाजपाने बनविलेला गट प्रयत्न करेल. निकाल बघून पळापळ होणारच असल्याचे संकेत पाटील यांनी दिले. तसेच भुजबळांना निवडणुकीचा कल कोणत्या बाजूने येणार याचा नेहमी अंदाज असतो. भुजबळ हे नाराज आहेत हे ऐकून आहे. अजित पवार नाराज आहेत की आजारी आहेत हे पण माहित नाही. माझा या कोणाशीच संपर्क नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
राजकीय नेत्यांनी अज्ञातवासात गेले तर त्याची चर्चा करण्याची एवढी गरज नाही. प्रायव्हसीची गरज असते, प्रचार केल्यानंतर एक-दोन दिवस सुट्टी घेतल्या तर अकांत तांडव करणे गरजेचे नाही. भारतीय जनता पक्षाला दोन पक्ष फोडून देखील जनाधार मिळत नाही ही वस्तूस्थिती आहे. जेवढे पक्ष घेताय तेवढा जनाधार कमी होणार आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली. बाळासाहेब ठाकरे यांचा ब्रँड उद्धव ठाकरेच आहेत. राज ठाकरेंचा वेगवेगळा वापर होतो, त्यामुळे त्यांच्यावर बोलणे योग्य नाही, असेही पाटील म्हणाले.