आम्हाला सोडायचे नाही, तुम्हीही कुठे जाऊ नका; काँग्रेसला पुन्हा जयंत पाटील यांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 12:59 PM2021-06-26T12:59:49+5:302021-06-26T13:00:02+5:30
राज्यातील महामंडळाचे वाटप तिन्ही पक्षांमध्ये समसमान पद्धतीने केले जाणार आहे. तसा निर्णय झाला आहे.
औसा (जि. लातूर) : काँग्रेसला आम्हाला सोडायचे नाही, मात्र तुम्हीही कोठे जाऊ नका, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी औसा येथे कार्यक्रमात दिला. सध्या महाराष्ट्रात काँग्रेसकडून स्वबळाचे फारच चालले आहे. त्यावर काय बोलावे म्हणून आम्ही गप्प आहोत. तुम्हाला कधीच दूर करायचे नाही. तुमच्याशिवाय आमचे नाही आणि आमच्याशिवाय तुमचे नाही. दोघेही एकमेकांना पूरक आहोत. आमच्या मनात वेगळे असे काही नाही. आम्हाला तुमच्याबरोबरच जायचे आहे, असे पाटील म्हणाले.
राज्यातील महामंडळाचे वाटप तिन्ही पक्षांमध्ये समसमान पद्धतीने केले जाणार आहे. तसा निर्णय झाला आहे. ओबीसींचे आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. निवडणुकीनंतर ही महाविकास आघाडी झाली असून, तिन्ही पक्ष एकत्रित चांगले काम करत आहेत.
आम्हालाही सोबत घ्या
काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ते म्हणाले, सरकार तीन पक्षांचे आहे. पण दोघांचाच बोलबाला दिसत आहे. आघाडीत काँग्रेसही आहे. आम्हालाही तुमच्यासोबत घ्या, असे पाटील म्हणाले.