जनहित याचिकांद्वारे खेळ खेळू नका, हायकाेर्टाने चित्रा वाघ यांना फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 08:04 AM2024-08-08T08:04:36+5:302024-08-08T08:04:51+5:30
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सत्तेत असताना चित्रा वाघ यांनी २०२१मध्ये संजय राठोड यांच्याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यावेळी राठोड वनमंत्री होते.
मुंबई : एकनाथ शिंदे गटाचे नेते संजय राठोड यांच्याविरोधातील याचिका निकाली काढण्याची मागणी करणाऱ्या चित्रा वाघ यांना उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. ‘परिस्थिती बदलली की, तुमची भूमिका बदलते. जनहित याचिकांद्वारे खेळ खेळला जात आहे. वाघ यांच्यासारख्या राजकीय नेत्या न्यायालयालाही त्यात गुंतवतात. पण, आम्ही त्याला प्रोत्साहन देणार नाही, अशा शब्दांत न्यायालयाने चित्रा वाघ यांना खडे बोल सुनावले.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सत्तेत असताना चित्रा वाघ यांनी २०२१मध्ये संजय राठोड यांच्याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यावेळी राठोड वनमंत्री होते. मात्र, पुण्याच्या एका मुलीच्या आत्महत्याप्रकरणात संजय राठोड यांचे नाव पुढे आल्याने त्यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. शिवसेनेत २०२२मध्ये फूट पडल्यानंतर संजय राठोड एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२२मध्ये राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश करताना त्यांना क्लीन चीट देण्यात आल्याचे सांगितले.
तरुणीला आत्महत्या करण्यास संजय राठोड यांनी प्रवृत्त केल्याचा संशय वाढल्याने त्यांची चौकशी करण्याची मागणी वाढत गेली. त्यावेळी चित्रा वाघ यांनी, राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करून तपासासाठी एसआयटी नियुक्त करावी किंवा तपास सीबीआयकडे वर्ग करावा, अशी मागणी करत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.
सरकारी वकील वेणेगावकर यांनी तपासाविषयी माहिती दिल्यानंतर वाघ यांचे वकील परांजपे यांनी याचिका निकाली काढण्याची वा मागे घेण्याची परवानगी मागितली. मात्र, याचिका मागे घेतली तरी नंतर न्यायालयात दाद मागण्याची मुभा द्यावी, अशी विनंती न्यायालयाला केली.
याचिका निकाली का काढावी?
वाघ यांच्या वकिलांनी केलेल्या या विनंतीनंतर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी वाघ यांना चांगलेच फटकारले. ‘आम्ही याचिका निकाली का काढावी? वाघ यांनीच त्यांची मागणी काय आहे, ते स्पष्ट करावे,’ असे मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने म्हटले. न्यायालयाच्या फटकाऱ्यानंतर वाघ यांचे वकील परांजपे यांनी, आपल्याकडे याचिका मागे घेण्यासंबंधी सूचना नाहीत. त्यामुळे यावर युक्तिवाद करू, असे न्यायालयाला सांगितले. त्यावेळी न्यायालयाच्या असे लक्षात आले की, याचिका चुकीने बुधवारच्या पटलावर लावण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयाने याचिका पटलावरून हटविण्याचे निर्देश दिले.
आत्तापर्यंत काय तपास केला?
- बुधवारी ही याचिका सुनावणीला आल्यानंतर न्यायालयाने मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांना आतापर्यंत काय तपास करण्यात आला? असा प्रश्न केला. त्यावर वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले की, तरुणीने आत्महत्या केली तेव्हा राठोड नागपूरला होते.
- राठोड यांच्या आवाजाचा नमुना एफएसला पाठविण्यात आला. व्हायरल झालेल्या क्लिपमधील आवाज संजय राठोड यांच्या आवाजासारखाच होता. पण, तो त्यांचा आवाज नसल्याचे एफएसएलने केलेल्या चाचणीत निष्पन्न झाले आहे.