...तर बाबासाहेबांच्या स्मारकासाठी राज्य गहाण ठेवू- मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 09:17 PM2018-10-03T21:17:55+5:302018-10-03T21:22:16+5:30
बाबासाहेबांच्या स्मारकाच्या उंचीवरुन सुरू असलेल्या वादावर मुख्यमंत्र्यांचं भाष्य
ठाणे: इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकावरुन सध्या सरकारवर टीका सुरू आहे. विरोधकांना जे जमलं नाही, ते आम्ही करुन दाखवलं, यासाठीच आता त्यांच्याकडून टीका केली जात आहे, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी राज्य गहाण ठेवावं लागेल, तरी आम्ही ते करु, असंही मुख्यमंत्री म्हणाले. रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेला 61 वर्ष झाल्याच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची कमी केल्याच्या मुद्यावरुन विरोधकांनी फडणवीस सरकारवर टीका केली होती. या टीकेला मुख्यमंत्र्यांनी आज उत्तर दिलं. 'बाबासाहेबांची उंची मोजू नका. पुतळ्याच्या आराखड्यात तसूभरही बदल केलेला नाही,' असं प्रत्युत्तर फडणवीस यांनी विरोधकांना दिलं. 'काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारनं इंदू मिलची जमीन स्मारकासाठी दिली नाही. मात्र आपलं सरकार आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अवघ्या 3 दिवसांमध्ये निर्णय घेतला आणि इंदू मिलची जमीन स्मारकासाठी दिली. आपण जे करुन दाखवलं, ते काँग्रेस-राष्ट्रवादीला जमलं नाही. त्यामुळेच त्यांच्या पोटात दुखतं आहे,' असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. बाबासाहेबांबद्दल वाद निर्माण करू नका, असं आवाहनदेखील त्यांनी केलं. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी प्रसंगी राज्यदेखील गहाण ठेवू, असं मुख्यमंत्री म्हणाले.
मोदी सरकार बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान बदलणार असल्याचा आरोप सातत्यानं विरोधकांकडून केला जातो. या आरोपांनाही मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं. 'खोटं बोल, पण रेटून बोल, असं सध्या काही जणांकडून सुरू आहे. संविधान आहे, म्हणून आज सर्वकाही आहे. त्यामुळे हे संविधान कोणीच बदलू शकत नाही,' असं मुख्यमंत्री म्हणाले. भाजपा सरकार समाजातील सर्व घटकांसाठी काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. 'मोदींनी अॅट्रॉसिटीचा कायदा मंजूर करुन घेतला. आरक्षण कायम ठेवलं. मराठा समाजालादेखील आम्ही नक्की आरक्षण देऊ. मात्र त्यासाठी इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही,' अशी हमी फडणवीसांनी दिली.