जळगाव - शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गटाला न्यायालयाने परवानगी दिली आहे हा निर्णय सर्वांनी मान्य केलाच पाहिजे, यात ठाकरे गटाने पहिली लढाई जिंकली असं होत नाही. तीन तासाची सभा त्यात कोणती लढाई असा टोला मंत्री गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरे गटाला लगावला आहे. आम्ही देखील बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे असंही त्यांनी सांगितलं.
गुलाबराव पाटील म्हणाले की, शिवतीर्थावर त्यांची सभा होत आहे ही चांगलीच गोष्ट आहे सभा झालीच पाहिजे पण त्या सभेत सोनिया गांधी आणि शरद पवारांचे विचार मांडू नका असा टोला लगावत आता नेमकं कोणाकडे जास्त लोक येतात याच्याकडे सर्वांचे लक्ष आहे असंही त्यांनी सांगितले.
देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजेपाकिस्तान झिंदाबादच्या घोषणाबाजी करणाऱ्या लोकांवर सरळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, त्यांना जेलमध्ये टाकून ते बाहेर येणारचं नाहीत, असे ठेचले पाहिजेत अशा शब्दात गुलाबराव पाटलांनी पीएफआय कार्यकर्त्यांचा समाचार घेतला आहे. गुलाबराव पाटील म्हणाले की, या देशाचं अन्न खायचं. हवा घ्यायची आणि पाकिस्तानचे नारे द्यायचे मग त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवून दिले पाहिजे. मला तर असं वाटतं कोणीही असो, कोणत्याही जातीधर्माचा असो पहिले देश महत्वाचा आहे असं असतांना जर देशाच्या बाबतीत अशी घोषणाबाजी होत असेल तर सरकारची आणि आपली जबाबदारी आहे की अशा वृत्तीला ठेचून टाकलं पाहिजे अशा प्रकारची घोषणाबाजी होत असल्याचं मी पण चॅनलवर पाहिलं, हाच मोठा पुरावा आहे त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे असं त्यांनी सांगितले.
घाबरायचं नसतं काम करत राहायचंजळगाव जिल्ह्याचा विकास आराखडा ४४० कोटी रुपयांचा आहे. मार्च अखेर हे पैसे खर्च कसे होतील याचं नियोजन करणे याला आपलं प्राधान्य असेल. जिल्ह्यातील ज्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे त्या कामांवरील स्थगिती उठवणे व त्यांना चालना देणे याला आपलं प्राधान्य असेल. आपल्याला जो रोल मिळाला तो निभाण्याचा माझा प्रयत्न असतो. मंत्री हा राज्याचा असतो जिल्ह्याचा नाही, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी अतिरिक्त जबाबदारीचा ताण येणार नसल्याचे सांगितले, एक जिल्हा काय आणि दोन जिल्हे काय घाबरायचं नसतं, काम करत राहायचं असं गुलाबराव पाटील म्हणाले.