एआयएमआयएम (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिमांना राजकीय धर्मनिरपेक्षतेपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच राज्य सरकारवरही जोरदार निशाणा साधला आहे. याच वेळी त्यांनी बॅचलर मुलांसंदर्भातही, असे वक्तव्य केले आहे, की ते सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ते महाराष्ट्राची राजधानी मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते.
बॅचलर्ससंदर्भात काय म्हणाले ओवेसी -तरुणांमध्ये जोश निर्माण करताना ओवेसी म्हणाले, लग्न करणार ना, बॅचलर (अविवाहित) राहू नका, बॅचलर फार त्रास देत आहेत. बायको घरात असली की माणसाचे डोकेही शांत राहते. खरे तर, ओवेसी मुस्लीम तरुणांना विचारत होते, की त्यांना त्यांच्या मुलांना अशिक्षित आणि गरीबच ठेवायचे आहे का? ते म्हणाले, 'जे तरुण आता 18-19 वर्षांचे आहेत, त्यांचे लवकरच लग्न होईल, त्यांना मुले होतील. यापुढे ओवेसींनी तरुणांना विचारले की, 'लग्न करणार ना? तुमच्या मुलांना त्यांचे हक्क मिळू नयेत, असे तुम्हाला वाटते का?'
धर्मनिरपेक्षतेपासून मुस्लिमांना काय मिळाले? -धर्मनिरपेक्षतेपासून मुस्लिमांना काय मिळाले? असा प्रश्नही ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) ओवेसी यांनी विचारला. ते म्हणाले, आपल्याला नौकऱ्या आणि शिक्षाणात आरक्षण मिळाले नाही, निर्णय घेण्यात आपला वाटा नव्हता, कुठलाही अधिकार नव्हता, धर्मनिरपेक्षता शब्दाने मुस्लिमांचे नुकसानच झाले आहे. महाराष्ट्रात, केवळ 22 टक्के मुस्लीम प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश घेतात तर केवळ 4.9 टक्के मुस्लीम पदवीधर आहेत. तसेच, महाराष्ट्रातील 83 टक्के मुस्लीम भूमिहीन आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे हृदय केवळ मराठा समाजासाठीच धडकते का? असा सवालही त्यांनी यावेळी केला. याच बरोबर त्यांनी मुंबईमध्ये कलम 144 लागू करण्यावरही नाराजी व्यक्त केली.