नवाब मलिकांवरून महायुतीत वादळ; फडणवीसांचं पत्र अन् राजकीय चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 08:56 AM2023-12-08T08:56:17+5:302023-12-08T08:56:47+5:30
त्यांना सोबत घेऊ शकत नाही; फडणवीस यांचे अजित पवारांना पत्र, नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसल्याने विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्षेप घेतला.
नागपूर - देशद्रोहाच्या आरोपानंतर तब्बल पाच अधिवेशनानंतर परतलेले माजी मंत्री नवाब मलिक थेट सत्ताधारी बाकावर बसल्याने महायुतीत वादळ उठले. विरोधी पक्षांनी आक्षेप घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून मलिक यांना महायुतीत घेण्यास विरोध केला. देशद्रोहाचे आरोप असताना मलिक यांना महायुतीचा भाग करणे योग्य होणार नाही, अशी भूमिका फडणवीस यांनी पत्रात मांडली आहे.
नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसल्याने विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्षेप घेतला. यावेळी झालेल्या खडाजंगीत फडणवीस यांनी विरोधकांना देशद्रोहाचा आरोप झाल्यानंतर मालिकांना मंत्रिपदावरून का काढले नाही, असा सडेतोड सवाल केला. अधिवेशनाचे कामकाज संपल्यानंतर अजित पवार यांना पत्र लिहून मलिकांना महायुतीत घेण्यास फडणवीस यांनी विरोध दर्शविला.
देवेंद्र फडणवीस पत्रात नेमके काय म्हणाले?
नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकारसुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रूता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो. परंतु ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे. सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे.
आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे. हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे. परंतु महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही करावा लागतो. त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे, असे फडणवीस यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे.वैद्यकीय आधारावर जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेल्या माजी मंत्री नवाब मलिक यांनी तब्बल पाच अधिवेशनानंतर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थिती दर्शविली.
महविकास आघाडीच्या विचारांशी सहमत नाही
त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालिन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नसल्याचे सांगत फडणवीसांनी विरोध दर्शविला आहे.
विधान परिषदेत खडाजंगी
विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माहितीच्या मुद्द्याद्वारे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मलिक सत्ताधारी पक्षांच्या बाकावर बसल्याने प्रश्न उपस्थित केला. सभागृहात एक आमदार सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत, ज्यांच्यावर दाऊद इब्राहिम सोबत संबंध असल्याचे आरोप करण्यात आले होते. त्यामुळे आता गृहमंत्र्यांनी यावर आपली भूमिका मांडावी, असे दानवे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर
दानवे यांच्या आक्षेपावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, ज्यांच्या नेत्यांनी प्रत्यक्ष जेलमध्ये असताना देखील (नवाब मलिक) आम्ही मंत्रिपदावरून काढणार नाही, अशी भूमिका घेतली होती ते आता इथे आता ही बाब मांडत आहेत, याचे आश्चर्य आहे. आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसलेलो नाही. मी आणि मुख्यमंत्री मांडीला मांडी लावून बसलो आहोत. आमच्या बाजूला अजितदादा मांडीला मांडी लावून बसले आहेत, त्यांच्या बाजूला भुजबळ साहेब बसले आहेत. त्यामुळे आमची काळजी करू नका. पहिल्यांदा तुम्हाला हे उत्तर द्यावं लागेल की, देशद्रोहाचा आरोप झाल्यानंतर ते जेलमध्ये असताना तुम्ही त्यांना मंत्रिपदावरून का काढलं नाही? याचं उत्तर आधी द्या, असेफडणवीस यांनी सुनावले.