मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू असल्यानं अनेक उद्योगधंदे ठप्प आहेत. लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका असंघटित क्षेत्रातल्या व्यक्तींना आणि हातावर पोट असलेल्या कामगारांना बसला आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी गृहनिर्माण विभागानं एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. घरभाडं वसुली तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात यावी, अशी सूचना विभागानं राज्यातल्या घरमालकांना केली आहे.लॉकडाऊनमुळे अनेकांसमोर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वत:चं घर नसलेल्या कुटुंबांसमोर तर दुहेरी संकट उभं ठाकलं आहे. त्यामुळे भाडेकरूंना दिलासा देण्यासाठी गृहनिर्माण विभाग पुढे सरसावला आहे. सध्याच्या बिकट आर्थिक परिस्थितीत घर भाडं वसुली पुढील तीन महिने पुढे ढकलावी. भाडं थकल्यानं कोणत्याही भाडेकरूंना घरांमधून बाहेर काढलं जाऊ नये, अशा सूचना राज्यातल्या सर्व घरमालकांना देण्यात आल्या आहेत.पुढचा काळ अतिशय कठीण आहे. त्यामुळे या परिस्थितीत गरिबांच्या मागे उभं राहायला हवं, अशी भूमिका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मांडली. लॉकडाऊनमुळे अनेकांचे हाल होत आहेत. भाडेकरू म्हणून राहणाऱ्या कुटुंबांसमोरील संकट तर अतिशय मोठं आहे. त्यामुळेच पुढील तीन महिने भाडेवसुली केली जाऊ नये, अशा सूचना सर्व घरमालकांना देण्यात आल्या आहेत. याचा अर्थ भाडं द्यायचंच नाही असा होत नाही. हातावर पोट असणाऱ्यांसमोर सध्या खायचं काय, भाडं द्यायचं कुठून असे प्रश्न निर्माण झाले आहेत. यातला घरभाड्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न गृहनिर्माण विभाग करत असल्याचं ते म्हणाले.महाराष्ट्र मोठ्या मनाचा आहे. त्यामुळे या परिस्थितीत घरमालक भाडेकरुंच्या पाठिशी उभी राहतील आणि भाड्यासाठी तगादा लावणार नाहीत, असा विश्वास आव्हाड यांनी व्यक्त केला. काही घरमालकांचं कुटुंब घर भाड्यातून येणाऱ्या पैशांवर चालतं, याची कल्पना आहे. मात्र कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रत्येक जण आपलं योगदान देत आहे. त्याप्रमाणे समाज व्यवस्था सांभाळण्यासाठी घरमालक योगदान देतील, अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली.
CoronaVirus नोकरीवरून काढून टाकाल तर याद राखा! पंतप्रधान नरेंद्र मोदींची नजर आहे