"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 01:12 PM2024-11-01T13:12:51+5:302024-11-01T13:15:07+5:30
Ajit Pawar Baramati News: विधानसभा निवडणुकीमुळे अजित पवार बारामती मतदारसंघातील गावांना भेटी देत आहेत. एका गावात बोलताना अजित पवारांनी ग्रामस्थांना विनंती केली.
Ajit Pawar Latest News : बारामती विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अजित पवारांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे अजित पवार सध्या बारामती विधानसभा मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहे. शुक्रवारी अजित पवारांनी अनेक गावांना भेटी देत प्रचार केला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी बारामती विधानसभा मतदारसंघातील गावांना भेटी दिल्या आणि ग्रामस्थांनी संवाद साधला. ढेकळेवाडी येथे बोलताना अजित पवार म्हणाले, "मी आपल्याला एक सांगेन की, जरा काही पुढाऱ्यांवर तिथली लोकं नाराज असतात. त्या पुढाऱ्यांचा राग काही माझ्यावर काढू नका."
मी कधीही जातीभेद केला नाही - अजित पवार
"दुसऱ्या निवडणुका असतील आणि तो पुढारी उभा असेल, तर काय राग काढायचा तो काढा. पण, माझ्यावर मेहेरबानी करून... मी कधीही जातीभेद केलेला नाही. माझी तुम्हाला विनंती आहे. मी सगळ्यांबाबत मदत करण्याचा, सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करतो", असे भाष्य अजित पवारांनी केले.
"दादा याला खतपाणी कसं घालतोय"
"काही काही लोकं पुढारपण करत असताना सगळ्यांना विश्वासात घेत नाहीत. त्यामध्ये आपणच गावचा कारभार करतो, असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यातून तुमचा लोकांचा समज होतो की, दादा, याला कसं खतपाणी घालतोय. मला माहिती पण नसतं. मी असतो मुंबई, पुणे किंवा बारामतीमध्ये. माझ्या पाठीला काही डोळे नाही. पण, मला कुणी सांगितलं की, दादा इथं असं असं आहे, तर मी लगेच त्याबद्दलचा जाब विचारू शकेन", अशी भूमिका अजित पवारांनी ग्रामस्थांशी बोलताना मांडली.