'मी आधीपासूनच सांगत होतो, पवार घराण्यावर विश्वास ठेवू नका'; पडळकरांचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 07:29 PM2021-12-24T19:29:37+5:302021-12-24T19:29:45+5:30
'सरकारचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे'
मुंबई: राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर आहेत. यावर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ST कामगाराचे शासनात विलिनीतरण शक्य नाही, अशी माहिती अजित पवारांनी विधानसभेत बोलताना दिली आहे. यानंतर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.
पवार घराण्यावर विश्वास ठेवू नका
गोपीचंद पडळकर म्हणाले की, 'पवार घराण्यावर विश्वास ठेवू नका, हे मी आधीपासूनच सांगत होते. मान्यता प्राप्त युनियन पवारांच्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या विषयातून यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला. अजित पवार यांना विलीनीकरण शक्य नाही, असे माहीत होते, तरीदेखील राष्ट्रवादीने आपल्या जाहीर नाम्यात का उल्लेख केला ? असा सवाल त्यांनी केला आहे.
सरकारने कर्मचाऱ्यांचा घात केला
पडळकर पुढे म्हणाले की, गेली 50 वर्ष हे कर्मचारी तुमच्यावर विश्वास ठेवून आहेत. ज्यांच्या पाठीमागे कर्मचारी राहिले, त्यांनीच आज कर्मचाऱ्यांचा घात केला. आम्ही आंदोलन करता होतो तेव्हा शिवसेना राष्ट्रवादीवाले म्हणत होते आम्ही कर्मचार्यांना भडकवत आहोत. आम्ही विरोधाला विरोध करणारे नाहीत. आज अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांचे संसार उघड्यावर आले. हे सर्व सरकारचे अपयश आहे. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
काय म्हणाले अजित पवार ?
एसटी कामगाराचं शासनात विलिनीतरण शक्य नाही अशी स्पष्ट ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत बोलताना दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाचा मुद्दा हायकोर्टात आहे. हायकोर्टाच्या निर्देशावरुन विलिनीकरणाची शक्यता तपासण्यासाठी एक समिती स्थापन झालेली आहे. त्या समितीने आपला अभ्यास सुरु केलेला आहे, त्या समितीने अभ्यासासाठी मुदत वाढ मागितल्याची माहितीही त्यांनी सभागृहाला दिली. तसेच, समितीचा अहवाल येईल तेव्हा येईल पण एसटी कामगार-कर्मचाऱ्याचे शासनात विलिनीकरण शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.