महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची चाहूल लागल्यानंतर आता विविध वृत्तसंस्थांकडून केले जाणारे ओपिनियन पोल प्रसिद्ध होऊ लागले आहेत. त्यात नुकत्यात प्रसिद्ध झालेल्या एका ओपिनियन पोलमधून महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी महायुतीला महाविकास आघाडीपेक्षा अधिक जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी या ओपिनियन पोलवर सडकून टीका केली आहे. तसेच ओपिनियन पोल हे ब्रह्मदेवानं तयार केलेले आहेत का? असा सवाल उपस्थित केला आहे. एवढंच नाही तर महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत १७५ ते १८० जागांवर विजय मिळेल, असा दावाही त्यांनी केला.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्राचा अंदाज वर्तवणाऱ्या ओपिनियन पोलबाबत विचारले असता, संजय राऊत म्हणाले की, हा सर्व्हे ब्रह्मदेवानं केलाय का?, मोदींनी ३५० जागा मिळतील म्हणून याच लोकांनी सर्व्हे केला होत ना, लोकसभेत भाजपाला ३५० जागा मिळतील आणि महाराष्ट्रात महायुतीला ४० जागा मिळतील, असा दावा करणारी हिच ती लोकं आहेत. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून आम्ही १७५ ते १८० जागा जिंकू, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
संजय राऊत पुढे म्हणाले की, या सर्व्हेंवर विश्वास ठेवू नका. हे जे सर्व्हे येताहेत ते लोकांची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. हे काम सुरू झालंय, याचा अर्थ महाराष्ट्रातले सत्ताधारी पराभूत होताहेत, असा दावाही संजय राऊत यांनी केला.
टाइम्स नाऊ-मॅट्रिझ यांचा सर्व्हे नुकताच प्रसिद्ध झाला होता. या सर्व्हेनुसार राज्यात आज निवडणुका झाल्यास भाजपा पुन्हा एकदा मोठा पक्ष ठरण्याची शक्यता असून, भाजपाला ९५ ते १०५ जागा मिळू शकतात. तर शिवसेना शिंदे गटाला १९ ते २४ जागा मिळू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ७ ते १२ जागांवरत समाधान मानावे लागू शकते. अशा प्रकारे महायुतीला आजच्या घडीला निवडणूक झाल्यास १२१ ते १४१ जागा मिळू शकतात, असा दावा करण्यात आला होता.
तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला ४२ ते ४७ जागा मिळतील असा अंदाज या सर्व्हेमधून वर्तवण्यात आला आहे. तर शिवसेना ठाकरे गटाला २६ ते ३१ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला २३ ते २८ जागा मिळू शकतात. अशा प्रकारे सद्यस्थितीत महाविकास आघाडीला ९१ ते १०६ जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. याशिवाय अपक्ष आणि इतर पक्षांच्या खात्यामध्ये ११ ते १६ जागा जातील, अशी शक्यता या सर्व्हेमधून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील ४० ते ४२ जागांवर अत्यंत चुरशीची लढत असल्याचेही या सर्व्हेमध्ये म्हटले होते.