मुंबई - छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंत यशस्वी प्रवास करणारा सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला. सुशांतच्या आत्महत्ये मागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. तर काहींनी सुशांतची हत्या केल्याचं म्हणत चौकशीची मागणी केली आहे. आत्महत्येप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. आतापर्यंत अनेकांचा जबाब नोंदवला गेला आहे. याच दरम्यान सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'मुंबई पोलीस हे कार्यक्षम आहेत. जर कोणाकडेही कोणते पुरावे असतील तर त्यांनी ते आमच्याकडे सोपवावे. कोणीही या प्रकरणाचं राजकारण करू नये असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. "जर कोणाकडे पुरावे असतील तर त्यांनी ते पोलिसांकडे सोपवावे. आम्ही दोषींची चौकशी करून त्यांना शिक्षा करू. मात्र या प्रकरणाचा वापर महाराष्ट्र आणि बिहार या राज्यांदरम्यान वाद उत्पन्न करण्यासासाठी करू नका" असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी अनेकांनी सीबीआय चौकशीची मागणी देखील केली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावर ट्विट केलं होतं. "सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा अशी लोकभावना आहे. पण, राज्य सरकारची तशी इच्छा दिसत नाही. या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराची एक बाजू समोर आली आहे. त्यामुळे ईडी गुन्हा दाखल करू शकते" असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राजकारण करू नये अशी प्रतिक्रिया दिली आहे.
"देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी जबाबदारीने बोलायला हवं. ते ज्या पोलिसांच्या क्षमतेवर शंका घेत आहेत, त्याच पोलिसांसोबत त्यांनी गेली पाच वर्षे काम केलं आहे. सुशांतसिंह प्रकरणी पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. याबाबत कोणाकडे काही ठोस पुरावे असतील तर ते पोलिसांकडे द्यावेत. त्यात तथ्य आढळल्यास जो कुणी दोषी असेल त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. सुशांतच्या चाहत्यांनी महाराष्ट्र सरकारवर विश्वास ठेवावा. महाराष्ट्र आणि बिहार या दोन राज्यांत वाद लावण्यासाठी जे कुणी राजकारण करत आहेत, त्यात फरफटत जाऊ नये. पुरावे दिल्यानंतर सरकारने कारवाई केली नाही तर नक्कीच तुम्ही आम्हाला जाब विचारा" असं मुख्यमंत्र्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाला नवे वळण आले आहे. सुशांतच्या वडील के. के. सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबावर (FIR Against rhea chakraborty) गंभीर आरोप करत गुन्हा नोंदवला आहे. यानंतर बुधवारी बिहारमधून चार पोलिसांचं पथक मुंबईत दाखल झालं होते. सुशांतच्या वडिलांनी केलेल्या आरोपाबाबत सर्वांचा जबाब नोंदवण्यास बिहार पोलिसांनी सुरुवात केली आहे. यानंतर आता सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
खरंच की काय? हजार, बाराशे नाही तर शेतकऱ्याला आलं तब्बल 64 लाख विजेचं बिल
CoronaVirus News : बापरे! कोरोनावर मात केलेल्या 80% रुग्णांना होतोय 'हा' आजार; वेळीच व्हा सावध
WhatsApp ग्रुपच्या नोटिफिकेशन्सना कंटाळलात?; आता कायमस्वरूपी Mute करून टाका!
CoronaVirus News : बाबो! क्वारंटाईन सेंटरमध्ये डॉक्टरांच्या जेवणाचं बिल आलं तब्बल 50 लाख
CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशात तब्बल 10 लाख लोकांनी जिंकली कोरोनाची लढाई