सिंधुदुर्ग: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. सायंकाळी त्यांना जामीन मंजुर झाला, पण या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले. दरम्यान, या घटनेमुळे राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेत खंड पडला होता. पण, त्यांनी दोन दिवसांपूर्वी आपली यात्रा सुरू केली आणि आज या यात्रेचा शेवटचा दिवस आहे.
नारायण राणेंनी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान कणकवलीत प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी अग्रलेख लिहिला, आता मी उद्यापासून प्रहार मधून लिहिणार, असा थेट इशारा राणेंनी दिला. तसेच, माझ्या घरावर आले, माझ्या मुलापर्यंत आले, मी विसरणार नाही. माझा त्यांना इशारा आहे, माझ्यातील नारायण राणे जागा करू नका, असं म्हणत नारायण राणेंनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
तुमच्या मालकाची मुलं काय करत आहेत...?राणे पुढे म्हणाले की, 'माझ्या जनआशीर्वाद यात्रेत मांजर आडवी गेल्यासारखं काही अपशकुन झाले. त्यानंतर आता अग्रलेख येत आहेत. कोणाच्या मुलांवर बोलण्यापेक्षा आपली मुले किती पराक्रमी आहेत, हे त्यांनी पहावं. संजय राऊत तुमच्या मालकाची मुलं काय करत आहेत ते आधी पाहा. राऊतांमुळे शिवसेना वाढत नाहीये. 'सामना'ची प्रतिमा बौद्धिक वर्गात चांगली नाही, असा घणाघातही राणेंनी केला.