पुणे : बारावीनंतर डी. एड्.अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून यंदा प्रवेश क्षमतेएवढेही अर्ज शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले नाहीत. परिणामी राज्यातील डी. एड्. अभ्यासक्रमाच्या तब्बल ३५ ते ४० हजार जागा रिक्त राहणार असे चित्र आहे. त्यामुळे ‘मास्तरकी नको रे ...’ असे म्हणणाºया विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे डी.एड्. अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून बुधवारी (दि.२४) तिसºया प्रवेश फेरीतून प्रवेश घेण्याचा शेवटचा दिवस आहे. राज्यात अनुदानित व विना अनुदानित डी.एड्. अभ्यासक्रमाच्या एकूण ५३ हजार जागा असून प्रवेशासाठी केवळ १० हजार ७२८ विद्यार्थ्यांनी आॅनलाइन पद्धतीने अर्ज केले आहेत. त्यामुळे एकूण प्रवेश क्षमतेएवढेही अर्ज प्राप्त झाले नाहीत. परिणामी प्रवेश अर्ज करणाºया प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश मिळणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये २० हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत डी.एड्.ला प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या निम्म्याने घटल्याचे दिसते. मागील वर्षापेक्षा यंदा प्रवेशाच्या दोन हजार जागा कमी झाल्या असून डीएडला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या १२ ते १५ हजारापर्यंत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. डी.एड्. अभ्यासक्रमास प्रवेश मिळावा, यासाठी काही वर्षांपूर्वी सुमारे एक ते सव्वा लाख विद्यार्थी अर्ज करत होते. त्यातील ५० टक्के विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत होते. आता विद्यार्थ्यांनीच डी. एड्.कडे पाठ फिरवली.