राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बीडमधील उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. या सभेत बोलताना, पवारांनी राष्ट्रवादीचे पूर्वाश्रमीचे नेते आणि सध्याचे शिवसेना मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यावर नाव न घेता टीका केली. सारखं सारखं कुंकू बदलायचं नसतं, घरोबा एकदाच करायचा असतो, असे पवारांनी म्हटले. पवारांच्या या टीकेला समोरील लोकांनी दाद दिली.
शरद पवार यांच्या झंझावती प्रचार दौऱ्यानंतर त्यांचा भाषणातील हातवारे आणि टीका टीपण्णी चर्चेचा विषय बनत आहे. बीडमध्ये आज पवार यांची सभा घेण्यात आली. या सभेत पवारांनी जयदत्त क्षीरसागर यांच्यावर जहाल टीका केली. ''मी गुदमरलो होतो म्हणून त्या घरी गेलो असे सांगत इथल्या नेतृत्वाने नवा घरोबा केला. ज्यांना तीन वेळा मंत्री केलं, सत्तेची ऊब आणि शक्ती दिली ते असं वागले. मात्र, असं सारखं कुंकू बदलायचं नसतं. घरोबा एकदाच करायचा असतो आणि तिथे प्रामाणिकपणाने राहायचं असतं. दुसऱ्या घरोब्याचा शोध केला तर लोक त्याबद्दल काय बोलतात हे न बोललेलंच बरं'', असे पवारांनी म्हटले.
बीडला सध्या एक वेगळेच वातावरण आहे. आपण ज्यांना साथ दिली, त्यांनी भलत्याच घरी प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. असा निर्णय घेणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचा निर्णय बीडकरांनी घेतला आहे. 1980 साली मी बीड जिल्ह्यात निवडणुकीसाठी जे उमेदवार दिले ते सगळे निवडून आले, त्याची पुनरावृत्ती यावेळी नक्की होणार. आज नवी पिढी उभारण्याची भूमिका आपण घेतली आहे. या भूमिकेला मोठा पाठिंबा बीड जिल्ह्यातून मिळतोय. परिवर्तनाच्या या लढ्यात बीडची जनता पुढाकार घेईल, असेही पवार म्हणाले.