मार्चमध्ये राज्याचे हिवाळी अधिवेशन झाले होते. या काळात राज्यात मोठ्या राजकीय घडामोडीही घडल्या. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवरून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला. यानंतर नुकताच अजित पवारांचे राष्ट्रवादीत बंडही झाले व ते सरकारमध्ये सहभागी देखील झाले. या साऱ्या घडामोडींनंतर आता पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. गेल्या वेळी अधिवेशनावेळी एक महत्वाची घटना घडली होती. याची राज्यभर चर्चा झाली होती.
हिवाळी अधिवेशनावेळी सभागृहात बोलू दिले जात नाही म्हणून आता सभागृहात येण्याची इच्छा नाही, असे सांगत विधीमंडळाच्या पायऱ्यांवर पाया पडत निघून गेलेले शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव विधानसभेत आले आहेत.
भास्कर जाधव काय म्हणालेले...आज मी सभागृहातून बाहेर पडलो. उद्या गुढीपाडवा आहे त्यानंतर ३ दिवस सभागृह आहे. मी गावी निघालोय आणि पुन्हा येणार नाही. कारण येण्याकरिता इच्छा राहिली नाही. भास्कर जाधव एकही दिवस सभागृह चुकवत नाही. मात्र यंदा मला जाणीवपूर्वक सभागृहात बोलू दिले जात नाही. मला विषय मांडू दिले जात नाही. नियमाने बोलण्याचा, सभागृह कायद्यानुसार चालवण्यासाठी मी आग्रही आहे, असे ते म्हणाले होते.
भास्कर जाधवांना समज द्यावी - विजय देशमुखभास्कर जाधव यांनी सकाळी विधानसभेच्या आवारात मीडियाला राज्यातील महिला अत्याचारावर व सोलापूरमधील घटनेचा उल्लेख करत असताना सोलापूरमधील विजय देशमुख असा नामोल्लेख केला. या दोन्ही घटनांशी माझा संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख करून भाजपाचा आमदार म्हणून माझ्या नावाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. राज्यातील जनतेसमोर नाहक बदनामी केली आहे. भास्कर जाधव यांना समज देण्यात यावी, पुन्हा मिडीयाला मुलाखत देऊन खुलासा करण्यास सांगावे, समज देण्यात यावी, अशी मागणी विजय देशमुख यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली.