ठाणे - राजकारणात काही बेरजेची गणिते असतात. त्याकरिता काही नवे मित्र सरकारमध्ये सामील करून घ्यावे लागतात. मात्र, त्यामुळे चिंता करायचे कारण नाही. हा एकनाथ शिंदे राज्याचा मुख्यमंत्री असून, त्याच्यामागे २०० पेक्षा जास्त आमदारांचे पाठबळ आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी ठाण्यातील मेळाव्यात आपल्या समर्थक आमदार व शिवसैनिकांना आश्वस्त केले. राष्ट्रवादीच्या सत्ता समावेशामुळे गेले काही दिवस शिंदे यांच्या पक्षात अस्वस्थता असल्याची चर्चा सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर शिंदे यांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.
शिंदे यांच्या राज्यव्यापी दौऱ्याचा प्रारंभ ठाण्यातील कार्यकर्ता मेळाव्याने झाला. त्यावेळी ते बोलत होते. या सरकारमध्ये सर्वसामान्य शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागणार नाही, याची काळजी मी घेतो आहे. सत्ता येते जाते. सत्तेकरिता आपला जन्म झालेला नाही. मात्र, सत्ता असताना असे काम करा की, सत्ता नसतानाही लोक तुमच्याकरिता थांबले पाहिजेत, असे शिंदे म्हणाले. बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांचे हे ठाणे आता तुम्ही शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे बनून सांभाळायचे आहे. ज्या पद्धतीने मी लोकांना भेटून त्यांची कामे करतो त्याप्रमाणे तुम्ही लोकांकरिता काम करा, असा सल्लाही त्यांनी दिला. शिवसेनेबरोबरची भाजपची युती ही भावनिक असल्याचे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
देवेंद्र फडणवीस हे कलंक असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्याचा समाचार घेताना शिंदे म्हणाले की, देवेंद्र यांना कलंक लावल्याचे बोलता. मात्र, २०१९ ला महायुतीला स्पष्ट बहुमत असताना तुम्ही महाविकास आघाडीबरोबर जाऊन महाकलंक लावण्याचे काम केले. तुम्हाला पण पट्टा लावायची वेळ येईल, असं काही जण बोलत आहेत. पण, एकनाथ शिंदेला पट्टा लावण्याची काय भीती दाखवता? सर पे कफन बांध दिया तो क्या डरना.. आपल्याला पट्ट्याची काय गरज? असे सांगत त्यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली. आगामी निवडणूक मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला लढायची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला ४५ पेक्षा जास्त जागा आणि विधानसभा निवडणुकीत २१० पेक्षा जास्त आमदार निवडून येणार असल्याची ग्वाही शिंदे यांनी दिली.