काळजी करू नका; परिवाराचं मी पाहतो; अजित पवारांचे वक्तव्य; पटोलेंना दिल्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 05:28 AM2023-08-08T05:28:03+5:302023-08-08T05:28:19+5:30
नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे, यावर बोलताना पवार यांनी त्यांना माझ्या शुभेच्छा, असे सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘आमचा परिवार आणि आमचा पक्ष कसा व्यवस्थित ठेवायचा, याची काळजी करू नका. मी पाहतो आहे,’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी जेजुरीला जाण्याआधी पुण्यात साखर संकुलमध्ये ते काही वेळ थांबले होते. तिथे त्यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. शाह यांना जयंत पाटील भेटलेच नाहीत. भेटले असे सांगतात ते धादांत खोटे आहे. ते सांगतात ते बरोबर आहे. ते आदल्या दिवशी पवार साहेबांबरोबर होते, त्यानंतर दुसऱ्या दिवशीही त्यांच्याबरोबरच होते. ते इकडे आले, शाह यांना भेटले, यात काहीही तथ्य नाही,’ असे पवार म्हणाले. ‘तुम्ही प्रवेश केला, त्यावेळी तुम्हीही आम्ही भेटलोच नाही, असे सांगितले होते,’ याकडे लक्ष वेधले असता पवार म्हणाले, ‘मी खरोखरच भेटलो नव्हतो. पाठिंबा दिला त्यानंतरच भेट घेतली. आधी भेट झाली नव्हती.’
नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे, यावर बोलताना पवार यांनी त्यांना माझ्या शुभेच्छा, असे सांगितले.
जयंत पाटील यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाली. जयंत पाटील भाजपसोबत जाणार, अशी चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ते कुठेही जाणार नाहीत, असे ठणकावून सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
या भेटीबाबत जयंत पाटील म्हणाले की, ही सदिच्छा भेट होती. ३१ ॲागस्ट आणि १ सप्टेंबर रोजी विरोधकांची आघाडी ‘इंडिया’ची बैठक मुंबईत होत आहे. त्या बैठकीच्या नियोजनाबाबत या भेटीत चर्चा झाली. इतर कुठलीही चर्चा झाली नाही. शरद पवार १७ ॲागस्टपासून पुन्हा राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. याबाबत जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना माहिती दिल्याचे समजते.
आपण भाजपसोबत जाणार या अफवा असल्याचे जयंत पाटील यांनीही स्पष्ट केले आहे. या मुद्यांवरून महाविकास आघाडीतही संभ्रमाचे वातावरण आहे. ते दूर करण्याचा प्रयत्न या भेटीत जयंत पाटील यांनी केला असण्याची शक्यता आहे.