खरीप पीक काही प्रमाणात गेले आहे. पिण्याच्या पाण्याची, हिरवा चाऱ्याची कमतरता भासू लागली आहे. लोकांना आताच प्रश्न पडला आहे. मात्र मराठवाड्यात परतीचा पाऊस येत असतो. तरीदेखील काळजी घेण्याची गरज आहे. धरणातील पाणीसाठा तुलनेने कमी आहे. ही नवीन समस्या, हे नवीन संकट राज्यावर आले आहे परंतु आपण कसलीही काळजी करु नका, कसलंही संकट आले तरी तुमच्या पाठिशी राज्यसरकार आहे हे कृतीतून आपण दाखवून मदत करण्यासाठी कुठे तसुभरही कमी पडणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
आज बीड येथील आमदार संदीप क्षीरसागर यांचे चुलत भाऊ डॉ. योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यावेळी अजित पवार यांनी मार्गदर्शन केले. २७ ऑगस्टला सभेला येणार आहोत त्याअगोदर राज्याचा कृषीमंत्री म्हणून मराठवाड्यातील आठ जिल्हयांची बैठक घ्या असे धनंजय मुंडे यांना सांगितले आहे. त्यामध्ये मदत व पुनर्वसन मंत्री, पाणीपुरवठामंत्री यांना या बैठकीला घ्या अशा सूचना दिल्याचे अजित पवार यांनी सांगितले. सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. त्यात कुठेही आम्ही बदल होऊ देणार नाही, आम्ही ढळणार नाही अशी ग्वाहीही अजित पवार यांनी यावेळी दिली.
डॉ. योगेश क्षीरसागर आणि सारीका क्षीरसागर हे परिवार मला भेटायला आले होते. जनतेची सेवा वैद्यकीय सेवा करत असताना नवीन नेतृत्व उदयास आले आहे. एखाद्या कार्यकर्त्याला ताकद देताना त्याचे नेतृत्व बघत असतो. जो विश्वास क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टाकला आहे त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. केंद्र आणि राज्य एका विचाराचे असले तरी त्यांना ताकद देण्याचे काम करायचे आहे. अनेक योजनांवर आपण काम करत आहोत. अर्थ आणि नियोजन जबाबदारी माझ्यावर आहे त्याचा फायदा चांद्यापासून बाद्यांपर्यंत कसा होईल त्यात माझ्या बीड जिल्हयाचा विचार कसा करता येईल असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
वेगळ्या पद्धतीने प्रचार व प्रसार करण्याचा किंवा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी सर्वांना बरोबर घेऊन जायचे आहे. अल्पसंख्याक समाजाला आपण असुरक्षित आहोत ही भावना तुमच्या मनात येऊ देणार नाही ही भूमिका घेऊन काम करत आहोत असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. २०१९ मध्ये शिवसेनेची वैचारिक भूमिका आणि राष्ट्रवादीची वैचारिक भूमिका वेगवेगळी होती तरीदेखील किमान समान कार्यक्रमाच्या माध्यमातून काही प्रश्न पुढे नेण्याचा प्रयत्न केला हेही अजित पवार यांनी आवर्जुन सांगितले.
कांदा प्रश्नी काल दोन लाख मेट्रिक टन कांदा २४१० रुपयांचा दर दिला आहे. विरोधकांनी अजून जादा दिला पाहिजे होता अशी मागणी केली आहे मात्र त्यांनीही आत्मचिंतन किंवा आत्मपरीक्षण करावे. आपण त्याठिकाणी होतो त्यावेळी डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली कशी परिस्थिती होती ही अनुभवली आहे. त्यामुळे आता नरेंद्र मोदींसारखे नेतृत्व आपल्या देशाला मिळाले आहे. त्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा. माझा मराठवाडा विकासात्मक पुढे यावा. मराठवाडा मुक्तीसंग्रामाला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. तोही चांगला कार्यक्रम करायचा आहे असेही अजित पवार म्हणाले.