मुंबई : राज्यपालांनी पहिल्यावेळी सत्तास्थापनेला बोलविल्यानंतर भाजपाने बहुमत नसल्याचे सांगत सरकार बनविण्यास नकार दिला होता. यानंतर शिवसेना, राष्ट्रवादीही सरकार स्थापनेस अपयशी ठरल्याने भाजपाने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या साथीने शनिवारी राज्याच्या राजकारणात भूकंप आणला होता. दोन दिवसांच्या नाट्यमय घडामोडींनंतर सर्वोच्च न्यायालयाने बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्याने अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर मुख्यमंत्री बनलेल्या देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा दिला होता.
या घडामोडींनंतर फडणवीसांवर टीका सुरू झाली होती. कारण फडणवीस, किरिट सोमय्या आणि एकनाथ खडसे यांनी आघाडी सरकारच्या काळात अजित पवार यांच्या विरोधात 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप करत बैलगाड्या भरून पुरावे आणले होते. तसेच गेली सहा वर्षांतील आणि मुख्यमंत्री काळातही फडणवीस यांनी पवार तुरुंगात चक्की पिसतील, तुरुंगात टाकणार अशी वक्तव्ये केली होती. निवडणूक प्रचारापुरता जरी हा मुद्दा असला तरीही फडणवीसांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर अजित पवारांना मिळालेली क्लिनचिट कळीचा मुद्दा ठरली आहे.
सोशल मिडीयावरही यावरून फडणवीस आणि भाजपा ट्रोल होऊ लागली आहे. अजित पवारांनी एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचे, ज्यांनी आरोप केले त्यांच्या हातूनच घोटाळ्याचे डाग पुसल्याचे यामध्ये म्हटले जात आहे. तसेच भाजपमधूनही दबक्या आवाजात अजित पवारांसोबत गेल्यामुळे टीका होत आहे. एकनाथ खडसे यांनी तर नुकतेच ते पुरावे रद्दीचा दर जास्त होता म्हणून रद्दीत विकल्याचा टोला लगावला आहे. यावर माजी मुख्यमंत्र्यांनी चुप्पीच साधली आहे.