काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजही सर्व बैठका रद्द केल्या आहेत. घशामध्ये इन्फेक्शनचे कारण सांगितले जात असून दोन दिवसांपूर्वी दरे गावी गेलेले असतानाही ते आजारी पडले होते. यानंतर रविवारी दुपारी ते ठाण्यात परतले होते. शिंदे यांचे आजारपण आणि मुख्यमंत्रिपदाचे भिजत घोंगडे याचे कनेक्शन राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. अशातच शिंदेंच्या बंगल्यावर शिवसेनेचे आमदार ये-जा करत आहेत. यावेळी विजय शिवतारे पोलिसांवर चांगलेच भडकल्याचे दिसले.
एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांनी गाडी अडवल्याने आमदार विजय शिवतारे संतप्त झाले होते. शिंदेंच्या ठाण्याताली निवासस्थानाबाहेर शिवतारेंची पोलिसांनी गाड़ी अडविली व कोण म्हणून चौकशी केली. यावेळी शिवतारेंनी तुम्हाला आमदार, माजी मंत्री ओळखता येत नाही का? असा सवाल पोलिसांना केला.
शिवतारे यांना मुख्यमंत्री काही भेटले नाहीत. यामुळे शिवतारे यांची श्रीकांत शिंदे यांनी उठबस केली. बाहेर आल्यावर शिवतारेंनी शिंदेंनी अशी कोणतीही आमदारांची बैठक बोलविलेली नाही, असे सांगितले. दोन दिवस मुख्यमंत्र्यांची तब्येत ठीक नव्हती. त्यांना ताप आला होता. कालच ते दरेगावातून मुंबईत आले. त्यामुळे त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी आलो होतो, अजूनही ते उपचार घेत आहेत, असे शिवतारे म्हणाले.
श्रीकांत शिंदे यांची भेट झाली. आता एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी आहे. आज कोणत्याही बैठका नव्हत्या. खातेवाटपाचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील, ते जे ठरवतील ते सर्वांना मान्य असेल, असेही शिवतारे म्हणाले.