मुंबई- कथ्थक नृत्याची खरी सेवा करणाऱ्या तसंच कथ्थक नृत्याच्या सच्च्या उपासक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सितारा देवी यांना गुगलने डूडलद्वारे मानवंदना दिली आहे. सितारा देवी यांच्या जयंती निमित्त गुगलने त्यांचं डूडल साकारलं आहे. सितारा देवी यांची आज 97 वी जयंती आहे. त्यासाठी गुगलने डुडलच्या माध्यमातून त्यांना सलाम केला आहे.
वयाच्या सोळाव्या वर्षी सितारा देवी यांची कथ्थक नृत्यावरील पकड पाहून खुद्द रवींद्रनाथ टागोरही भारावून गेले होते. त्यांनी सितारा देवी यांना ‘नृत्यसम्राज्ञी’ अशी उपाधी दिली.
सितारा देवी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1920 रोजी कोलाकातामधील नर्तक सुखदेव महाराज यांच्या घराण्यात झाला. सितारा देवी 11 वर्षांच्या असताना त्यांचं कुटुंब मुंबईत वास्तव्यास आलं. सितारा देवी यांचं मूळ नाव धनलक्ष्मी होतं.
सितारा देवी यांना संगीत नाटक अकादमी, पद्मश्री आणि कालिदास सन्मान यांसारख्या प्रतिष्ठीत पुरस्कारांनी गौरवण्यात आलं.सितारा देवी यांना 1973 मध्ये पद्मश्री पुरस्कार जाहीर केला होता, मात्र त्यांनी तो नाकारला. भारत सरकारला माझ्या योगदानाचं महत्त्व नाही. हा माझ्यासाठी सन्मान नाही तर अपमान आहे. मला भारतरत्न मिळायला हवं, असं म्हणत त्यांनी पुरस्कार नाकारला होता.सितारा देवी यांनी बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींना नृत्याचं प्रशिक्षण दिलं. मधुबाला, रेखा, माला सिन्हा आणि काजोल यांसारख्या अभिनेत्रींनी त्यांच्याकडून कथ्थकचं शिक्षण घेतलं होतं.
सितारा देवी यांचं वयाच्या 94 व्या वर्षी मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमध्ये निधन झालं. सितारा देवी यांना पोटदुखीच्या आजारामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्याचवेळी उपचारादरम्यान 25 नोव्हेंबर 2014 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
सितारा देवी यांनी सिनेमात केलं काम शहर का जादू (1934), जजमेंट ऑफ अल्लाह (1935), नगीना, बागबान, वतन (1938), मेरी आंखें (1939) होली, पागल, स्वामी (1941), रोटी (1942), चांद (1944), लेख (1949), हलचल (1950) आणि मदर इंडिया (1957) या सिनेमात त्यांनी काम केलं आहे.