नवी मुंबई : करावे गावातील गणेश मंदिरातून चांदीची कमान चोरणाऱ्या दोन आरोपींना एनआरआय पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांनी इतरही मंदिरामध्ये चोरी केल्याचे तपासात समोर आले आहे. श्रद्धास्थान असलेल्या मंदिरातील कमान परत मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये नेरूळमधील रिक्षाचालक कनीकलाल ऊर्फ कल्लू सालीग्राम जैसवाल व नाशिकमधील सराईत गुन्हेगार शंकर शामराव कापसे यांचा समावेश आहे. या दोघांनी त्यांच्या इतर साथीदारांसह १० नोव्हेंबरला करावे गावच्या गणेश मंदिरातून १० किलो वजनाची चांदीची कमान पळवून नेली होती. सकाळी मंदिरात आलेल्या पुजाऱ्याच्या ही गोष्ट निदर्शनास आली. या घटनेमुळे पूर्ण नवी मुंबईमध्ये खळबळ उडाली होती. मंदिराचे विश्वस्त दत्तात्रेय तांडेल यांनी एनआरआय पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे व उपआयुक्त प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी तपास सुरू केला होता. सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक माहिती तपासून एका रिक्षाचालकावर संशय बळावला होता. त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत होते. ६ जानेवारीला तो बालाजी मंदिराजवळ आडोशात संशयास्पदरीत्या कोणाशीतरी बोलत असल्याचे निदर्शनास आले. त्याला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याचे नाव कनीकलाल ऊर्फ कल्लू सालीग्राम जैसवाल व त्याच्या सहकाऱ्याचे नाव शंकर शामराव कापसे असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी मंदिरामध्ये चोरी केल्याचे कबूल केले. दोघांनाही अटक करून न्यायालयात हजर केले असता १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. अटक आरोपींकडे चौकशी केल्यानंतर कनीकलाल याने मंदिराची रेकी करून सर्व माहिती कापसेला दिली होती. मंदिरामध्ये चांदीची कमान आहे तेथे सुरक्षा रक्षकही नसल्याचे त्याने सांगितले होते. मंदिर परिसरात कोण किती वाजता येते याविषयी सर्व अभ्यास करून त्यांनी रात्री चोरी केली होती. त्यांनी लपवून ठेवलेली चांदीची कमानही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. अजून काही आरोपी फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे. या तपासामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक फल्ले, विजय चव्हाण, भूषण कापडणीस, प्रकाश साळुंखे, सुधीर पाटील, प्रशांत बेलोटे, अमोल भोसले व इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे करावे ग्रामस्थांनीही त्यांचे आभार मानले.>करावे गावातील गणेश मंदिरात झालेल्या चोरीचा तपास पोलीस आयुक्त हेमंत नगराळे व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. या प्रकरणी नेरूळमधील रिक्षाचालक व नाशिकमधील सराईत गुन्हेगारांना अटक करून १० किलो वजनाची चांदीची कमान हस्तगत केली आहे. इतर आरोपींचाही शोध सुरू आहे. - शेखर बागडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,एनआरआय>गणेश मंदिरामध्ये चोरी झाल्यामुळे सर्व ग्रामस्थांना धक्का बसला होता. पोलिसांनी या गुन्ह्याचा लवकरच तपास लावण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. एक महिन्यामध्ये गुन्ह्याचा तपास लावून चांदीची कमान परत मिळविल्यामुळे ग्रामस्थांचे आनंदाचे वातावरण आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन. - विनोद म्हात्रे,नगरसेवक, करावे गाव >करावे ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या मंदिरात चोरी झाल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे व सर्वच पोलिसांनी आरोपींना अटक करून चांदीची कमान परत मिळविल्यामुळे सर्वांचे आभार व अभिनंदन. - सुमित्र कडू, शिवसेना विभाग प्रमुख
करावे मंदिरातील कमान चोरणारे गजाआड
By admin | Published: January 18, 2017 3:13 AM