मुंबई : ३८५ कोटी रुपयांच्या महाघोटाळ्यामुळे, सगळ्याच योजनांना कुलूप लागलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचा कारभार रुळावर येण्यास सुरुवात होत असून, दोन वर्षांपासून पडून असलेल्या १०० गाड्यांपैकी २१ गाड्या मातंग समाज बांधवांना वितरित करण्यास, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे, तसेच लवकरच कर्जवाटपाला सुरुवात करण्यात येणार आहे.सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, ‘१ मार्चला या गाड्यांचे वितरण करण्याचा कार्यक्रम येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात होईल. एक लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या मातंग समाज बांधवांना, भाजीविक्रीच्या व्यवसायासाठी या गाड्या देण्यात येणार आहेत. या नव्या गाड्या दोन वर्षांपासून पडून असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. त्याची दखल घेत, आता वाटप करण्यात येणार आहे. या गाड्या मिरॅकल मोटर्स या फर्मकडून महामंडळाने खरेदी केल्या होत्या. या खरेदीची प्रक्रिया नियमबाह्य होती. महामंडळाने ५९ गाड्यांच्या डिझायनिंगचे काम सानवा मोटर्स, ठाणे यांना दिले होते. त्यांनी निकषांनुसार गाड्या तर बनविल्याच, शिवाय त्या आजही सुस्थितीत ठेवलेल्या आहेत. त्यातीलच २१ गाड्यांचे वाटप आता १ मार्चला होणार आहे. (प्रतिनिधी)४१ गाड्यांचा हिशेब नाही४१ गाड्या बनविण्याचे काम इब्राहिम मोटर्स, कुर्ला यांना देण्यात आले. या गाड्यांचे इन्स्पेक्शन करायचे असल्याने, ‘त्या दाखवा,’ असे पत्र आम्ही या फर्मला वारंवार दिले, पण प्रतिसाद मिळत नाही, असे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. इब्राहिम मोटर्स आणि मिरॅकल कंपनी एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याची माहिती आहे. एका गाडीची किंमत ७ लाख रुपये आहे.
बंद महामंडळाचे दार उघडले
By admin | Published: February 28, 2016 1:40 AM