उमरखेड, दि. ६ - माहूर येथील किल्ल्यातील प्रेमी युगुलाचा खून हा ऑनर किलिंगचा प्रकार असल्याचे उघडकीस आले आहे. तरूणीच्या वडिलांनीच सुपारी देऊन त्या दोघांची हत्या घडवून आणली असून स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी त्या तरूणीचे वडीस काका व चुलत भावाला अटक करण्यात आली आहे.
१० सप्टेम्बर २०१४ रोजी माहूर च्या रामगढ किल्ल्यात २२ वर्षीय निलोफर बेग या युवतीसह तिचा प्रियकर शाहरुख फेरोज खान पठाण या युवकाचा मृतदेह सापडला होता. या खुनामुळे जिल्ह्यात आणि राज्यात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी जोरदार प्रयत्न करत आरोपींना अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार अत्यंत सुनियोजीत कट रचून हे हत्याकांड घडवण्यात आले होते. आपल्या खानदानीच्या तोडीचे खानदान (कुटुंब) शाहरुखचे नाही या साठी आपल्या मुलगी निलोफरसह तिचा प्रियकर शाहरुखचा काटा काढण्यात आला.
निलोफर आणि शाहरुख दोघे तंत्निकेतन पुसद येथे पदविका अभ्यासक्रमाला सोबत होते. अगोदर एकदा निलोफरने शाहरुखची तक्रार सुद्धा केली होती. तेव्हा शाहरुखच्या काकाने हे प्रकरण मिटवले होते. तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमत निलोफर उत्तीर्ण झाली आणि शाहरुख नापास झाला. निलोफर पुसदच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात दुस-या वर्षात शिकत होती. शाहरुखच्या काकाने निलोफरच्या घरा समोर पुसद मध्ये घर घेतले होते. शाहरुख तेथेच राहत होता. निलोफरने एकदा तक्रार केल्या नंतर सुद्धा शाहरुखने तिच्या सोबत सुत जमवलेच आणि दोघांचे प्रेम प्रकरण हळू हळू आकार घेत होते. निलोफरच्या कुटुंबियांना ही प्रेम कहाणी पसंद नव्हती. या दोघांचा काटा काढण्यासाठी खलबत रचले गेले. त्यात निलोफरच्या कुटुंबाने कोठेच भ्रमणध्वनीचा वापर केला नाही. प्रत्यक्ष भेटी गाठी घेऊन हा कट रचण्यात आला.
९ सप्टेम्बर २०१४ शाहरुख यवतमाळ येथुन आपल्या गाडीत आला आणि निलोफरसह माहूर गडावर गेला. अगोदरच नियोजन असल्याने निलोफरचे काही नातलग नांदेडला आले. आणि ९ सप्टेम्बरला सायंकाळी पुसद पोलिस ठाण्यात निलोफारची मिसिंग (हरवल्याची) तक्रार दाखल झाली. दुस-या दिवशी निलोफर आणि शाहरुखचे मुडदे सापडले.
स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी हे दुहेरी खून प्रकरण उगडकीस आणले. या खुना साठी अगोदर अटक केलेल्या ५ जणांना माहूरचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्र. ती. खराटे यांनी ७ नोहेंबर पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. काल पकडलेल्या ५ जणांना आज माहूर न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती सांगण्यात आली. पकडण्यात आलेला विकार अहमद हा या दुहेरी खून प्रकरणाचा फिर्यादी आणि निलोफरचा चुलत भाऊ आहे. मिर्झा खालेद बेग हे निलोफरचे वडील तर नवाब अली हे तिचे काका आहेत.