- अनिकेत घमंडी/ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. 06 - जवळचे भाडे नाकारणे, मनात येइल तेव्हाच रस्त्यावर गाड्या धावणे, यासह प्रवाशांशी उद्धट वर्तन करणे, मनमानी भाडी आकारणे अशा काही रिक्षाचालकांच्या उद्दाम पणाला डोंबिवलीकर वैतागले आहेत. अशा मनमानी कारभार करणा-या रिक्षाचालकांची मुजोरी मोडीत काढण्यासाठी नागरिकांनी एकत्र येत व्हाट्सअॅप ग्रुप स्थापन केला आहे. त्यावर कोणाला रिक्षा चालकाचा कटू-चांगला अनुभव आल्यास तातडीने तो शेअर करावा, संबंधितांचा तात्काळ योग्य तो समाचार घेण्यात येणार असल्याचा निर्धार करण्यात आला आहे.
दोन दिवसांपासून या गृपी चर्चा सुरु झाली आणि बुधवारी संध्याकाळपर्यंत सुमारे अडीचशेहून अधिक सदस्यांनी हा ग्रुप स्विकारत आपापली मते स्पष्ट केली. ज्या सदस्यांनी एकत्र येत हा ग्रुप स्थापन केला, त्यांनी तातडीने एक बैठक लावावी असे आवाहन करण्यात आले. त्यात केवळ रिक्षाचालकच नव्हे तर मुजारी करणारे कोणीही वाहनचालक असो त्यांची मुजोरी मोडीत काढण्यात यावी याबद्दल सगळयांचे एकमत झाले. एवढेच नव्हे तर वाहन चालकांची कार्यशाळा घ्यावी, त्यांना रस्ता वाहतूकीचे नियम सांगावेत तसेच वाहतूक नियंत्रण आणि आरटीओ अधिका-यांशी चर्चा करणे आदी उपक्रम सातत्याने घेण्यात यावेत यावर सगळयांचे एकमत झाले. तसेच जो कोणी वाहनचालक चांगले काम करेल त्यांचा योग्य तो सन्मान करण्यात यावा, चांगुलपणा आणि सामाजिक बांधिलकी या निमित्ताने वाढीस लागावी हा प्रमुख प्रयत्न असेल अशीही सकारात्मक चर्चा ग्रुपवर करण्यात आली. नियमानूसार रिक्षा चालवणे, तीन सीट घेण्यात याव्यात, मीटर पद्धत सुरु करा आदी मत देखिल मांडण्यात आली.
- विशेष म्हणजे कोणत्याही राजकीय पाठींब्या शिवाय हा चमू स्थापन करण्यात आला आहे. तो अबाधित रहावा असे सर्वानूमते ठरवण्यात आले आहे. त्यात आरटीओ, ट्रॅफिकसह रिक्षा चालक-मालक युनयिन पदाधिका-यांचाही समावेश करण्यात आला असून हळुहळू त्याची व्याप्ती वाढवण्याचे आवाहन एकमेकांना करण्यात येत आहे. त्यातून जनजागृती होईल, आणि जो कोणी उपद्रवी असेल त्याला वेळीच चाप बसेल असा प्रयत्न असल्याचे ठरवण्यात आले.
ग्रुपवर लोकमतची चर्चा : बुधवारच्या लोकमतमधील हॅलो ठाणे मध्ये केडीएमटी प्रवाशांच्या मदतीला अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्याची चर्चा दिवसभर ग्रुपवर सुरु होती. नागरिकांनी केवळ बसनेच प्रवास करावा, रिक्षाने प्रवास करु नये असे आवाहन देखिल करण्यात आले. अनेक सदस्यांनी त्यास पाठींबा बसने प्रवास कराच. त्याशिवाय रिक्षाचालकांचा मनमानी कारभार कमी होणार नाही असे परखड मत व्यक्त करण्यात आले.