ऑनलाइन लोकमत
रत्नागिरी, दि. 13 - शुक्रवारी सायंकाळी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी घरांचे नुकसान झाले. वादळी वा-यामुळे घरावर झाडे कोसळून नुकसान झाले आहे. जिल्ह्यात एकूण २ लाख ५ हजार ९०० रूपयांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. सर्वत्र एकूण ४०.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, सर्वाधिक पाऊस मंडणगड तालुक्यात झाला.
शुक्रवारी ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट व वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी तुरळक शिडकावा झाला. मात्र, अनेक भागात जोरदार पाऊस झाला. राजापूर परिसरात गारा कोसळल्या. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. मंडणगड तालुक्यात सर्वाधिक २३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
संगमेश्वर तालुक्यात ११, लांजा ६.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. खेड, दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर तालुक्यात शून्य मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंडणगड तालुक्यातील मौजे आतले येथील जितेंद्र जाधव, सुहास सावंत, भागवत जाधव, गंगाराम करवडे, अशोक करवडे यांच्या घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे. मौजे नाचणे येथील बाजी दळवी, मौजे देव्हारे येथील वसंत तांबे, नरेश तांबे, साबरी गावातील अर्जुन धोंडू पोरदुरे, वेरळ येथील मारूती पिंगळे, तसेच कुडूल भू येथील सचिन शिगवण यांच्या घरांचे वादळी वाºयामुळे नुकसान झाले आहे.
दापोली तालुक्यातील आंजर्ले येथे डी. के. सारंगकर यांच्या घराची पडवी कोसळून ९० हजारांचे नुकसान झाले आहे. तसेच सुधाकर कृष्णा भोसले यांच्या घरावर माडाचे झाड कोसळून ४५ हजारांचे नुकसान झाले. साखरोली येथे विलास महादेव वाजवेकर यांच्या घराचे ५,५०० रूपयांचे नुकसान झाले, परंतु जीवितहानी झाली नाही. खेड तालुक्यातील मौजे खारी येथील रमेश दाजी भुवड यांच्या घराच्या आवारात वणवा लागून २ बैल व एक गाय मृत्यूमुखी पडली.