कोपरगाव (जि. अहमदनगर) : पैशाची मागणी पूर्ण न झाल्याने सुनेला जाळून मारल्याप्रकरणी सासू व नणंदेला जन्मठेप तर पती व सास-यास प्रत्येकी एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आऱ ए़ गायकवाड यांनी ठोठावली़हुंड्यापोटी २५ हजार रुपये आणण्यासाठी सासू शीला चिखले, सासरा बाळासाहेब चिखले, नवरा पवन आणि नणंद सारिका हे कोपरगाव येथील रेणुका पवन चिखले हिला शारीरिक व मानसिक त्रास देत होते़ ९ जून २००६ रोजी रेणुका स्वयंपाक घरात असताना शीला हिने तिच्या अंगावर रॉकेल ओतले व सारिकाने पेटवून दिले़ या गोष्टीस पवन व बाळासाहेब यांनी प्रोत्साहन दिले़ पेटत्या अवस्थेत रेणुकाला घरात सोडून सर्वजण निघून गेले़.परिसरातील लोकांनी आग विझवून तिला रुग्णालयात दाखल केले. पण दुस-याच दिवशी तिचा मृत्यू झाला़ याप्रकरणी घरातील चौघांविरुद्ध हुंडाबळी कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता़ या खटल्यात एकूण १५ साक्षीदार तपासण्यात आले़ रेणुकाचा मृत्यूपूर्व जबाब ग्राह्य धरण्यात आला़ (प्रतिनिधी)
हुंडाबळी प्रकरणी सासू, नणंदेला जन्मठेप
By admin | Published: December 06, 2014 2:15 AM