नागपूर : पती व त्याच्या नातेवाईकांच्या क्रूरतेमुळे लग्नानंतर १५ दिवसांतच सासरचे घर सोडणाऱ्या पत्नीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घटस्फोट मंजूर केला आहे. न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व इंदिरा जैन यांनी हा निर्वाळा दिला आहे.पुष्पेंद्र व निकिता असे प्रकरणातील पती-पत्नीचे नाव असून २८ नोव्हेंबर २००९ रोजी त्यांचे लग्न झाले होते. पुष्पेंद्र व त्याच्या कुटुंबातील अन्य सदस्यांची वाईट वागणूक पाहता निकिता १३ डिसेंबर २००९ रोजी माहेरी परतली. यानंतर ती सासरी परत गेली नाही. तिने पुष्पेंद्रकडून मिळणाऱ्या क्रूरतापूर्ण वागणुकीच्या आधारावर घटस्फोट मिळण्यासाठी सुरुवातीला नागपूर कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. कुटुंब न्यायालयाने १२ जून २०१४ रोजी याचिका खारीज केली. या निर्णयाविरुद्ध निकिताने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने कुटुंब न्यायालयाचा वादग्रस्त निर्णय रद्द करून निकिताला घटस्फोट मंजूर केला. निकिता दूरसंचार विभागात महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहे. पुष्पेंद्रही समान विभागात समान पदावर नोकरी करीत आहे. निकिता एकमेव मुलगी असल्यामुळे तिच्या वडिलांनी धुमधडाक्यात लग्न केले. पुष्पेंद्रला कार व सोन्याच्या वस्तू भेट दिल्या. वरपक्षाकडील मंडळींना काहीही कमी पडू दिले नाही. परंतु, लग्नानंतर निकिताला सासरी वाईट वागणूक मिळत होती. सावळ्या वर्णामुळे तिला पुष्पेंद्र व त्याच्या नातेवाईकांचे टोमणे ऐकावे लागत होते. तिला शिवीगाळ करण्यात येत होती. घरातील सर्व कपडे धुवायला लावले जात होते. असे असतानाही ती सासरी राहण्यास तयार होती. तिने सहारनपूरला बदली होण्यासाठी अर्जही केला होता. परंतु, पती व अन्य जण बदलण्यास तयार नसल्याचे पाहून तिने बदली अर्ज रद्द केला. पुष्पेंद्र दिल्लीत फ्लॅट घेऊन मागत होता. उच्च न्यायालयाने घटस्फोट मंजूर करताना या सर्व बाबी लक्षात घेऊन यावरून पतीची क्रूरता सिद्ध होत असल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
पतीच्या क्रूरतेमुळे पत्नीला घटस्फोट
By admin | Published: November 01, 2016 4:19 AM