कोरेगाव भीमा : शिरुर तालुक्यात संपूर्ण दारूबंदीसाठी क्रांतिवीर प्रतिष्ठानने पुढाकार घेत ८९ गावांतील ग्रामसभांचे दारुबंदीचे ठराव करुन राज्यात दारुबंदीबाबत एक पाऊल पुढे टाकले. यात पोलिसांनी सहभाग नोंदवित शिक्रापूर व रांजणगाव पोलीस ठाणेहद्दीत १०० टक्के दारुबंदी जाहीर केल्याबद्दल व दारुविक्री चालू असलेल्या बिटातील बीट अंमलदारावर कारवाई करणार असल्याबद्दल सत्कारही करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात पुणे-नगर महामार्गावर गावठी हातभट्टी व देशी-विदेशी दारुविक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असून, संबंधित बीट हवालदारावर कोणतीही कारवाई न झाल्याने दारुबंदीचा फार्स झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. क्रांतिवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून संजय पाचंगे यांनी शिरुर तालुक्यात ग्राहक पंचायत, शेतकरी संघटना, पतंजली योग समिती, ओबीसी सेवा संघ, किसान संघ, यशस्विनी सामाजिक अभियान या संघटनांच्या मदतीने ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्या उपस्थितीत ९ आॅगस्ट रोजी दारुबंदीचे अभियान सुरु करीत एक लाख सह्यांची मोहीम हाती घेत १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत शिरुर तालुक्यातील पंचायत समितीसह शिरुर नगर परिषद व ९३ ग्रामपंचायतींपैकी ८९ ग्रामपंचायतींनी दारुबंदी जाहीर करुन स्वातंत्र्यानंतर राज्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात दारुबंदी करुन इतिहास रचला. तर शिक्रापुरात ग्रामसभेत गोंधळाने ठराव स्थगित ठेवण्यात आला आहे. तालुक्यातील ८९ गावांमध्ये दारुबंदीचे ठराव झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी दारुबंदीसाठी बैठक आयोजित करण्याची आवश्यकता आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांनी जनमत लक्षात घेऊन दारुबंदीसाठी शासनपातळीवर लक्ष घालण्याची मागणी संजय पाचंगे यांनी केली आहे. पुणे-नगर महामार्गालगत सणसवाडी हद्दीत बेकायदा देशी दारुविक्री सुरु आहे. पोलिसांनी अद्याप कोणतीच कारवाई केली तर नाहीच, शिवाय सणसवाडीमध्ये जवळपास आठ ते दहा गावठी दारुधंदेही चालु असल्याने त्यांच्यावर अंकुश नक्की कोणाचा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. गावठी हातभट्टी व्यवसायही भर लोकवस्तीत चालू असूनही ग्रामपंचायतीने त्यांच्यावर काहीच कारवाई न केल्याने ग्रामपंचायतींनी दारुबंदीचा फक्त ठरावच केल्याने दारुबंदी होणार कशी, अशी परिस्थिती पाहण्यास मिळत आहे. ज्या बीट हवालदाराच्या हद्दीत अवैध दारुविक्री चालू आहे अशा कर्मचाऱ्यांवरही पोलीस निरीक्षकांनी कोणतीच कारवाई न केल्याने शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांनी शंभर टक्के दारुबंदीची व बीट हवालदारावर कारवाईची केल्याची घोषणा हवेतच गेली असून, शंभर टक्के दारुबंदीबाबत पोलीस उघडे पडत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.कोठेही दारूविक्री चालू असल्यास संपर्क कराशिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शंभर टक्के दारुबंदी झाली असून, तरीही अजून कोठे दारुविक्री होत असल्यास त्वरित शिक्रापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांनी सांगितले. याबाबत नागरिकांनी पुढाकार घ्यावा, त्यांची नावे गुप्त ठेवण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. दारूबंदी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणारदारुबंदीसाठी शासकीय अधिकाऱ्यांना व पोलीस ठाण्यांना १५ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली असून, दारुबंदी झाली नाही तर तहसीलदार, पोलीस निरीक्षक, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील व बीट अंमलदारावर गुन्हे दाखल करण्यात येणार असून, पोलीस ठाण्यांना महिलांचा घेराव घालणार असल्याचे क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी सांगितले. दारुबंदीत आर्थिक लागेबांध्यांमुळे व दारुविक्रेत्यांना पुढाऱ्यांचे पाठबळ मिळत असल्याचेही पाचंगे यांनी सांगितले.दारूबंदीसाठी १५ दिवसांची मुदत कशाला ?क्रांतिवीर प्रतिष्ठानने शिरुर तालुक्यात संपूर्ण दारुबंदीसाठी तहसील कार्यालय, गटविकास अधिकारी, पोलीस व राज्य उत्पादन शुल्क यांना १५ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली असून, त्यानंतर या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, मात्र शंभर टक्के दारुबंदी केल्याबद्दल पोलीस निरीक्षकांचा सत्कार केल्यानंतर प्रतिष्ठानने १५ सप्टेंबरपर्यंत पुन्हा मुदत का दिली, असा सवाल नागरिक करीत आहेत. 1949 मुंबई दारुबंदी कायदा नुसार जिल्हाधिकारी हे जिल्हास्तरावर, तहसीलदार हे तालुकास्तरावर तर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी हे दारुबंदी अधिकारी आहेत. याबाबत शिरुर तालुक्यात दारुबंदीचा नारा चालू असतानाच रांजणगाव पोलीस ठाण्यांतर्गत १६ गावांमध्ये संपूर्ण दारुबंदी केली असल्याचे पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी जाहीर करताच शिक्रापूर पोलीस ठाण्यांतर्गत ३३ गावांमध्ये दारुबंदी जाहीर केल्याचा दावा पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांनी केला. कारवाईचा रोज अहवाल द्यावा24 आॅगस्टला बीट हवालदारांना त्यांच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करतानाच अवैध दारुवरही कारवाई करुन रोज अहवाल द्यावा अन्यथा उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड यांच्या पथकाने अवैध धंद्यांवर छापा टाकून कारवाई केल्यास संबंधित बीट हवालदरास जबाबदार धरुन खातेनिहाय कारवाईबाबत वरिष्ठांना अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे आदेश दिले. मात्र तरीही ही बाब बीट हवालदार गांभीर्याने घेत नसल्याने राजरोसपणे दारुधंदे लोकवस्तीलगतच चालू आहेत. कारवाई करण्यास पोलीसच टाळाटाळ करत असल्याने त्यांच्यावर कारवाई होणार का? हा प्रश्न आहे.
पुणे-नगर महामार्गावर दारूबंदीचा फार्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2016 2:22 AM