मुंबई : एमआयडीसी कॉलनी, चिंचवड येथील राहत्या घरात शारदा संपत काळे या विवाहितेचा ९८ टक्के भाजून झालेला मृत्यू हा खून नव्हे, तर आत्महत्या होती, असा निष्कर्ष नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी या प्रकरणात शारदाचा पती संपत बाबासाहेब काळे व विवाहित नणंद ताराबाई धनाजी धायगुडे यांची या घटनेनंतर ३० वर्षांनी निर्दोष मुक्तता केली.
संपत व ताराबाई यांनी केलेली अपिले मंजूर करून न्या. शरद बोबडे व न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. ९ जुलै १९८९च्या पहाटे शारदा भाजली होती. उपचारादरम्यान तिचा पुण्याच्या ससून इस्पितळात मृत्यू झाला होता.
ससूनचे एक डॉक्टर डॉ. संजीव छिब्बर व विशेष न्याय दंडाधिकारी कमलाकर आढाव यांना शारदाने दिलेल्या मृत्यूपूर्व जबानीच्या आधारे संपत व ताराबाई यांच्यावर खून (भादंवि कलम ३०२) व नवविवाहितेचा छळ (४९८ए) या गुन्ह्यांसाठी खटला दाखल झाला होता. पुणे सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना निर्दोष सोडले. परंतु सरकारने केलेल्या अपिलात दोषी ठरवून उच्च न्यायालयाने दोघांनाही जन्मठेप ठोठावली. दोघांनीही सर्वोच्च न्यायालयात याविरोधात अपील केले.
या खटल्यात कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. उपलब्ध साक्षी-पुराव्यांची छाननी करून सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, संपत व ताराबाई यांनी शारदाच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जाळले नसावे तर तिनेच जाळून घेऊन आत्महत्या केली असावी, अशी प्रबळ शक्यता दिसते. याच संशयाचा फायदा देत आरोपींना निर्दोष सोडण्यात आले.
शारदाने दिलेल्या दोन्ही मृत्यूपूर्व जबान्या हा सबळ पुरावा मानून उच्च न्यायालयाने तेवढ्याच आधारे संपत व ताराबाई यांनीच शारदाचा खून केला, असा निष्कर्ष काढला होता. मात्र शारदा ९८ टक्के भाजलेली होती, तिला स्ट्राँग वेदनाशामक इंजेक्शन दिलेले होते व ती जबानी देण्याच्या स्थितीत असल्याचे प्रमाणपत्र डॉक्टरांनी जबानी नोंदविण्याच्या आधी नव्हे, तर जबानी नोंदवून झाल्यानंतर दिले होते हे लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने या मृत्यूपूर्व जबान्या संशयास्पद ठरविल्या.
उच्च न्यायालयाने १३ आॅक्टोबर २०१० रोजी शिक्षा ठोठावल्यापासून संपत तुरुंगात आहे. आता त्याची मुक्तता होईल. सातारा जिल्ह्याच्या खंडाळा तालुक्यातील लोणंद गावी राहणारी ताराबाई जामिनावर आहे. तिचा जामीनही आता रद्द होईल. या अपिलाच्या सुनावणीत आरोपींसाठी अॅड. उदय बी. दुबे यांनी तर राज्य सरकारसाठी अॅड. निशांत कतनेश्वरकर यांनी काम पाहिले.सौभाग्यलंकार ठेवले उशीखालीसंपत व शारदा यांचे घर दोन खोल्यांचे होते. शारदा आतील बाजूस असलेल्या स्वयंपाकखोलीत जळाली होती. घटनेनंतरच्या पंचनाम्यात मंगळसूत्र, नाकातील नथनी व पायातील पैंजण हे शारदाचे सौभाग्यलंकार शेजारच्या खोलीतील बिछान्यावर उशीखाली मिळाले होते. याचा संदर्भ देत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, विवाहित स्त्री शक्यतो हे अलंकार काढून ठेवत नाही. परंतु शारदाचे ते अलंकार अंगावर नव्हे, तर उशीखाली मिळाले यावरून आत्महत्या करण्याचे ठरविल्यावर तिनेच ते काढून ठेवले असावेत, अशी प्रबळ शक्यता वाटते.