जयेश शिरसाट मुंबईमालवणी दारूकांडातील आरोपींनी कट रचून १०४ जणांची हत्या केली, या निष्कर्षापर्यंत गुन्हे शाखा पोहोचली आहे. त्यानुसार या प्रकरणी गजाआड असलेल्या ९ आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा नोंदविण्याचा निर्णयही गुन्हे शाखेने घेतला आहे. हा गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपींना जन्मठेपेची शिक्षा होऊ शकेल.१८ जूनला मालवणीतल्या ३ गुत्त्यांवरील गावठी दारूमुळे विषबाधा होऊन १०४ जणांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन व व्हिसेरा चाचणीतून मृतांच्या शरीरात निव्वळ मिथेनॉल हे विषारी औद्योगिक रसायन आढळले. या गुत्त्यांवरून मिथेनॉलमिश्रित पाणी गावठी दारू म्हणून ग्राहकांना पाजण्यात आली हे स्पष्ट झाले.या प्रकरणी मन्सूर लतीफ खान उर्फ आतीक, किशोर पटेल, सलीमुद्दीन शेख आणि फ्रान्सीस डीमेलो हे चार मुख्य आरोपी आहेत. एरव्ही गुत्त्यांवर गावठी दारूमुळे अधिक नशा यावी म्हणून त्यात काही प्रमाणात मिथेनॉल मिसळण्याची प्रथा रूढ होती. पण या प्रकरणात तर गावठी नव्हतीच; फक्त मिथेनॉलच होते, असे गुन्हे शाखेच्या तपासातून पुढे आले.मिथेनॉल विषारी असून, ते जास्त प्रमाणात शरीरात गेल्यास तो माणूस दगावू शकतो, याची जाणीव चौघांनाही होती. हत्येचे कलम जोडण्यासाठी आरोपींचा हेतू किंवा इरादा स्पष्ट होणे आवश्यक होते. त्याशिवाय हे कलम न्यायालयात टीकू शकले नसते. मात्र आरोपींचा हेतू स्पष्ट झाला असून, तो न्यायालयात सिद्ध होईल इतपत पुरावे हाती आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली. अटक आरोपींचे उद्या रिमांड असून, त्याआधीच मालवणी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात हत्येचे कलम जोडण्यात येईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळते.
दारूकांडात हत्येचे कलम जोडणार
By admin | Published: July 10, 2015 3:58 AM